आरोग्य विम्याचे ६१ हजार कुटुंबांना वाटप

By Admin | Updated: June 21, 2016 01:41 IST2016-06-21T01:41:34+5:302016-06-21T01:41:34+5:30

राजकारणाबरोबरच समाजकारणातही अग्रेसर असलेल्या माजी आमदार विवेक पाटील यांनी वाढदिवसानिमित्त ६१ हजार कुटुंबांना आरोग्य विम्याचे वाटप केले.

Allocation of health insurance to 61 thousand families | आरोग्य विम्याचे ६१ हजार कुटुंबांना वाटप

आरोग्य विम्याचे ६१ हजार कुटुंबांना वाटप

पनवेल : राजकारणाबरोबरच समाजकारणातही अग्रेसर असलेल्या माजी आमदार विवेक पाटील यांनी वाढदिवसानिमित्त ६१ हजार कुटुंबांना आरोग्य विम्याचे वाटप केले. रविवारी कर्नाळा स्पोर्ट्स अकादमीत पार पडलेल्या या कार्यक्रमापूर्वी ब्राझील येथील रियो आॅलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या आयोनिका पॉल हिला सहकार्य करण्यासाठी उभारण्यात आलेल्या अद्ययावत शूटिंग रेंजचे उद्घाटन राष्ट्रवादीचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमात माजी मंत्री पतंगराव कदम, राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे, शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील, माजी मंत्री गणेश नाईक, आमदार पंडित पाटील, आमदार धैर्यशील पाटील, आमदार सुरेश लाड, आमदार नरेंद्र पाटील, माजी मंत्री मीनाक्षीताई पाटील, आरपीआय डेमोक्र ॅटिकचे अध्यक्ष कनिश्क कांबळे, राष्ट्रवादीचे रायगड जिल्हा अध्यक्ष वसंत ओसवाल आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शरद पवार म्हणाले, सिडकोचा साडेबारा टक्केचा लढा असो, जेएनपीटीमधले प्रश्न असो वा प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन सर्वच लढ्यात शेतकरी कामगार पक्षाने नेहमीच आवाज उठवला आहे. राजकारणाबरोबरच समाजकारणातही अग्रेसर असलेल्या विवेक पाटील यांनी कर्नाळा स्पोर्ट्स अकादमीची उभारणी करून खेळाडूंमध्ये आत्मविश्वास निर्माण केला आहे. या अकादमीच्या माध्यमातून अनेक खेळाडू आज उत्कृष्ट कामगिरी करीत असून देश-विदेशात चमकत असल्याचे प्रतिपादन पवार यांनी केले. विवेक पाटील यांची कार्य करण्याची ऊर्जा ही तरुणांना लाजवणारी असल्याचा उल्लेखही त्यांनी यावेळी केला.
शेकापचे नेते जयंत पाटील यांनी पनवेलसारख्या शहरात जागतिक दर्जाचे शूटिंग रेंज तयार होते, ही पनवेलकरांसाठी अभिमानाची बाब आहे. पनवेलला वेगळे महत्त्व आहे. याठिकाणची भूमी पुरोगामी आहे. सनातनसारखी प्रतिगामी संस्था याठिकाणी येते आणि पुरोगामी विचारसरणीच्या लोकांची हत्या करण्याचे शिक्षण देते ही दु:खाची बाब असल्याची खंत जयंत पाटील यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)

Web Title: Allocation of health insurance to 61 thousand families

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.