नवी मुंबई : ठेकेदारावर अंदाजपत्रकापेक्षा कमी दराने कामे करण्यासाठी दबाव टाकला जात आहे. यामुळे विकासकामांच्या दर्जावर परिणाम होत असून निकृष्ट दर्जाची कामे होत आहेत. अनेक ठिकाणी वाळूऐवजी खडीचा भुसा वापरला जात असल्याचे नगरसेवकांनी स्थायी समितीमध्ये निदर्शनास आणून दिले आहे.महापालिका आयुक्तपदाचा कार्यभार तुकाराम मुंढे यांनी स्वीकारल्यापासून ५ लाखांपेक्षा जास्त व २६ लाख रुपयांपेक्षा कमी किमतीची कामे करताना अंदाजपत्रकापेक्षा कमी दरामध्ये केली जात आहेत. ठेकेदाराने जास्त रकमेची निविदा सादर केली तरी त्यांना दर कमी करण्यास भाग पाडले जात आहे. स्पर्धेत टिकण्यासाठी ठेकेदार कामे घेतात व हलक्या दर्जाचे साहित्य वापरत आहेत. प्रशासन कमी दराने कामे करत असल्याचा दावा करत आहेत. कागदावर ते चांगले दिसत असले तरी प्रत्यक्षात निकृष्ट दर्जाची कामे होत आहेत. शिवसेना नगरसेवक नामदेव भगत यांनी याकडे सभागृहाचे लक्ष वेधले. अनेक ठेकेदार वाळूऐवजी खडीचा भुसा वापरत आहेत. इतरही निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जाते. एकाही इमारतीचे बांधकाम वेळेत पूर्ण होत नाही. पालिकेचा पैसा वाचण्याऐवजी जादा पैसे जात असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. तुकाराम मुंढे यांच्या कार्यकाळातील कामांची माहिती मागविणार असल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.महापालिका क्षेत्रात होणारी कामे दर्जेदार असली पाहिजेत. कामाच्या दर्जाशी समझोता केला जावू नये अशी अपेक्षा नगरसेवकांनी केली आहे. प्रशासनानेही कामे देताना अंदाजपत्रकातील साहित्याचे दर व प्रत्यक्षात बाजारभाव यांचा ताळमेळ घालावा. ठेकेदारांवर दबाव आणून कमी दराने कामे करण्यास भाग पाडू नये, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
महापालिकेत निकृष्ट दर्जाची कामे, वाळूऐवजी खडीचा भुसा वापरल्याचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 01:17 IST