विमानतळ प्रकल्पाची गती मंदावणार!
By Admin | Updated: August 10, 2016 03:34 IST2016-08-10T03:34:44+5:302016-08-10T03:34:44+5:30
देशाच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी असलेला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प एकहाती हाताळणाऱ्या सिडकोच्या सह व्यवस्थापकीय संचालिका व्ही. राधा यांची उत्पादन शुल्क विभागाच्या

विमानतळ प्रकल्पाची गती मंदावणार!
कमलाकर कांबळे, नवी मुंबई
देशाच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी असलेला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प एकहाती हाताळणाऱ्या सिडकोच्या सह व्यवस्थापकीय संचालिका व्ही. राधा यांची उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या बदलीमुळे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाची गती मंदावण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
व्ही.राधा यांचा सिडकोतील कार्यकाळ २२ मे रोजी संपुष्टात आला. आपल्या तीन वर्षांच्या कार्यकाळात राधा यांनी सकारात्मक कामावर भर दिला. आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मार्गातील विविध अडथळे दूर करण्यासाठी त्यांनी विविधस्तरावर प्रयत्न केले. भूसंपादनाला विरोध करणाऱ्या प्रकल्पग्रस्तांशी सुंसवाद साधला. या प्रकल्पाच्या दृष्टीने त्यांचे मन वळविण्यासाठी सकारात्मक प्रयत्न केले. त्यासाठी गावोगावी जावून बैठका घेतल्या. महिलांशी चर्चा केली. विमानतळबाधितांना देवू केलेल्या पुनर्वसन पॅकेजसंदर्भात त्यांचे प्रबोधन केले. इतकेच नव्हे, तर प्रकल्पग्रस्त महिला आणि त्यांच्या पाल्यांसाठी विविध प्रकारचे प्रशिक्षण कोर्सेस सुरू केले आहे.
आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पातील भूसंपादनाच्या कामात त्यांचे भरीव योगदान राहिले आहे. भूसंपादनाला विरोध करणाऱ्या ग्रामस्थांना सकारात्मक करण्यासाठी त्यांनी बजावलेली भूमिका महत्त्वाची मानली जाते. सध्या विमानतळ प्रकल्पाच्या मार्गातील सर्व अडथळे दूर झाले असले तरी प्रकल्पग्रस्तांचे काही प्रश्न शिल्लक आहेत. गावांच्या स्थलांतराला त्यांचा विरोध आहे. संपादित जमिनीच्या बदल्यात पुष्पकनगरमध्ये देण्यात येत असलेल्या भूखंडाचे करारपत्र घ्यायलाही प्रकल्पग्रस्तांकडून फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. या प्रश्नांवर तोडगा काढण्याचे सिडकोचे प्रयास सुरू असतानाच व्ही. राधा यांची बदली झाल्याने त्याचा फटका या प्रकल्पाच्या कामाला बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.