वाशीत वायुगळती; घरगुती गॅसपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 23:43 IST2020-12-31T23:43:04+5:302020-12-31T23:43:08+5:30
महापालिकेचे काम सुरू असताना लाइन फुटल्याचा प्रकार

वाशीत वायुगळती; घरगुती गॅसपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांचे हाल
नवी मुंबई : महापालिकेच्या वतीने वाशीमध्ये सांडपाणी वाहून जाणाऱ्या ड्रेनेजसाठी कनर्व्हटचे काम सुरू असताना महानगर कंपनीची घरगुती गॅसची पाइपलाइन फुटून गुरुवारी दुपारी गॅसगळती झाली होती. या वेळी वाशी येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी गॅसगळतीवर नियंत्रण मिळविले.
वाशी परिसरात इमारतींना गॅसपुरवठा करणारी ही मुख्य गॅस पाइपलाइन फुटल्याने गॅसचे मोठे फवारे हवेत उडत होते. यामुळे आजूबाजूची दुकाने बंद करीत वाहतूक थांबविण्यात आली होती. गळतीमुळे वाशी विभागातील सेक्टर ६, ७, ८, ९, १०, १४ आणि १६ परिसरातील महानगर गॅसच्या ग्राहकांची सेवा थांबविण्यात आली होती.
दुपारी वायुगळती झाल्यानंतर काही मिनिटांतच महानगर गॅस कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाइपलाइनचा व्हॉल्व बंद केला. महानगर कंपनीचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी तत्काळ वायुगळती आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. वाशी अग्निशमन दलाने गॅसगळतीवर नियंत्रण मिळविले.
गेल्या दोन-तीन महिन्यांपासून वाशी फायर स्टेशन वाहतूक सिग्नलसमोरील रस्त्यालगत पावसाळी पाणी बाहेर जाण्यासाठी महापालिकेच्या वतीने ड्रेनेजसाठी कनर्व्हटसाठी खड्डे खोदण्याचे काम सुरू असताना वायुगळती झाल्याचे निदर्शनास आले.
- अरविंद शिंदे, कार्यकारी अभियंता, वाशी
वाशी जैन मंदिराजवळ वायुगळती झाल्याचे निदर्शनास येताच अग्निशमन दलाच्या जवानांनी सुरक्षेसाठी त्वरित सभोवताली अडथळे उभे करून आजूबाजूची दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. महानगर गॅस कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या सहकार्यामुळे गळतीवर नियंत्रण मिळविले.
- पी. व्ही. जाधव, विभागीय अग्निशमन अधिकारी, वाशी.