चार दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 02:54 AM2018-07-16T02:54:27+5:302018-07-16T02:54:37+5:30

चार दिवसांच्या विश्रांतीनंतर रविवारी दोन्ही शहरांना पावसाने पुन्हा झोडपले.

After four days of rest, the rain receded | चार दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा झोडपले

चार दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा झोडपले

Next

पनवेल : चार दिवसांच्या विश्रांतीनंतर रविवारी दोन्ही शहरांना पावसाने पुन्हा झोडपले. दिवसभर नवी मुंबई धुक्यात हरवली होती. पनवेल परिसरही जलमय झाला होता. शहरात अनेक ठिकाणी वृक्ष कोसळले असून, गणपतीपाडा येथे दोन घरे पडल्याची नोंद झाली आहे.
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये दिवसभर जोरदार पाऊस सुरू होता. शहरात सर्वत्र धुके पसरल्यामुळे महामार्गावर दिवसाही वाहनांनी लाइट लावल्याचे पाहावयास मिळत होते. जवळपास दहा ठिकाणी वृक्ष कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. पडलेले वृक्ष बाजूला काढण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना धावपळ करावी लागली. गणपतीपाडा परिसरामध्ये पुन्हा दोन घरे कोसळल्याची घटना घडली आहे. ऐरोलीमधील भीमनगर परिसरामध्ये टँकरला आग लागल्याची घटना सायंकाळी घडली आहे.
खड्ड्यांमुळे चर्चेत आलेल्या सायन-पनवेल महामार्गावर पुन्हा एकदा ठिकठिकाणी पाणी साचल्याचे पाहावयास मिळाले. विशेष म्हणजे, खड्डे व साचलेल्या पाण्यामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. तुर्भे उड्डाणपूल, सीबीडी उड्डाणपूल, कोपरा उड्डाणपूल या ठिकाणच्या खड्ड्यांमुळे सुमारे तीन ते चार किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा लागलेल्या या वेळी पाहावयास मिळाले. कळंबोली, खारघर टोलनाक्याजवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने महामार्गावरील सुमारे तीन लेन पाण्याखाली गेल्या होत्या. खड्डे बुजण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना राबविली जात नसल्याने तात्पुरत्या स्वरूपात केलेली मलमपट्टी जोरदार पावसामुळे गेल्याने खड्ड्यांची संख्या वाढत चालली आहे. मागील २४ तासांत पनवेल तालुक्यात ४१.८० पावसाची नोंद करण्यात आली आहे. वाऱ्यासह पाऊस पडल्याने खारघर शहरात दोन ठिकाणी झाडे कोसळण्याची घटना घडली. तालुक्यातील पर्यटन ठिकाणी पर्यटकांनी मोठी गर्दी केल्याचे या वेळी पाहावयास मिळाले.
>नेरुळमध्ये झाड कोसळले : शनिवारी मुसळधार पावसावेळी वाºयामुळे नेरुळ सेक्टर-१६ येथील अष्टविनायक सोसायटीच्या आवारातील नारळाचे झाड कोसळले. हे झाड रस्त्यावर पडल्याने त्या ठिकाणी वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता; परंतु पालिकेचे पथक दुसºया ठिकाणी व्यस्त असल्याने त्यांना विलंब लागण्याची शक्यता होती. यामुळे राष्टÑवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गणेश भगत, सहकारी दिलीप खांडे, अंकुश माने, बाजीराव धुमाळ, रवींद्र भगत, शिवाजी पिंगळे आदींनी हे झाड रस्त्यावरून हटवले.
>कळंबोलीकर हैराण
कळंबोलीतील नाले तुंबल्याने पाणी रस्त्यावर साचले आहे. करवली नाका, सुधागड शाळा, स्टेट बँक, सेक्टर ४, ५, ८, १०, १४, पनवेल-सायन महामार्गावरही पावसाचे पाणी साचले आहे. रस्ते पाण्यात बुडाल्याने वाहने चालवण्यास कसरत करावी लागत आहे. रोडपालीच्या अंतर्गत रस्त्यावर पाणी साचत आहे. सेक्टर-१४ येथील ज्ञानमंदिर शाळेमागे रस्त्यावर दीड फूट पाणी साचले होते. सेक्टर-४मध्ये सखल भागात पाणी साचत असल्याचे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे. याला सिडको जबाबदार असल्याचे मत बबन बारगजे यांनी व्यक्त केले.
रविवार सुट्टी असल्याने कळंबोलीकर घराबाहेर पडण्यास नकारघंटा देत आहेत. मार्केटमध्येही पाणी साचल्याने सगळीकडे शुकशुकाट दिसत आहे. तर काही दुकानदारांनी आपली दुकाने बंदच ठेवणे पसंत केले आहे.
>वाहतूककोेंडी कायम
पावसाळा सुरू झाल्यापासून शहरात वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. रविवारीही सायन-पनवेल महामार्गावर तुर्भेमध्ये वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पामबीच रोडवर मोराज सिग्नल ते वाशी सेक्टर-१७पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. खारघर व इतर ठिकाणीही वाहतूककोंडी झाली होती.
>पुन्हा दोन घरे पडली
गणपतीपाडा येथे गतआठवड्यात एक घर कोसळले होते. रविवारी पुन्हा तेथील दोन घरे पावसामुळे कोसळल्याची घटना घडली आहे. महानगरपालिकेने ३० घरे खाली करण्याची नोटीस दिली आहे; परंतु घरे खाली करून कोठे जायचे? असा प्रश्न रहिवाशांनी उपस्थित केला आहे. शिवसेना शाखाप्रमुख महेश कोठीवाले यांनीही विस्थापित होणाºया नागरिकांच्या राहण्याची पहिली सोय करावी, अशी मागणी महानगरपालिकेकडे केली आहे.
>वृक्ष कोसळलेली ठिकाणे
सीबीडी सेक्टर-६
सानपाडा रेल्वेस्थानक
दिघा मुकुंद कंपनीजवळ
बेलापूर सेक्टर-११
वाशी नवरत्न हॉटेल
नेरुळ सेक्टर-८ एल मार्केट
वाशी सेक्टर-९
कोपरखैरणे गाव गणपती मंदिर समोर
>मोरबे लवकर भरणार
नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालकीच्या मोरबे धरण परिसरामध्ये समाधानकारक पाऊस पडत आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून रविवारी पहाटेपर्यंत १९७० मिलीमीटर एवढी पावसाची नोंद झाली आहे. ८४.७० मीटर एवढे धरण भरले आहे. धरण पूर्ण भरण्यासाठी फक्त तीन मीटर शिल्लक आहे. पावसाचा जोर कायम राहिला, तर यावर्षी लवकर धरण भरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
>पावसाचे प्रमाण
विभाग शनिवार रविवार
बेलापूर ७३.२० ७४.२
नेरुळ ७२.२० ६८.४
वाशी ५० ७०.२
ऐरोली ३४.१० ७२. ९

Web Title: After four days of rest, the rain receded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.