अमली पदार्थासह आफ्रिकन व्यक्तीला अटक; गुन्हे शाखेची कारवाई
By सूर्यकांत वाघमारे | Updated: April 30, 2023 14:39 IST2023-04-30T14:39:33+5:302023-04-30T14:39:36+5:30
११ लाख ६० हजाराचे मेथॅक्यूलॉन जप्त

अमली पदार्थासह आफ्रिकन व्यक्तीला अटक; गुन्हे शाखेची कारवाई
नवी मुंबई : गुन्हे शाखा पोलिसांनी तळोजा येथून एका आफ्रिकन व्यक्तीला अटक केली आहे. त्याच्याकडून ११ लाख ६० हजार रुपये किमतीचे मेथॅक्यूलॉन जप्त करण्यात आले आहे.
तळोजा येथे एक विदेशी व्यक्ती राहत असून तो अमली पदार्थ पुरवठा करत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्याद्वारे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथकाने शुक्रवारी रात्री तळोजा येथील कृपा रेसिडेन्सी इमारतीमधील संशयित घरावर छापा टाकला.
यावेळी घरातील एका आफ्रिकन व्यक्तीने तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्या घर झडतीमध्ये त्याच्याकडे ११ लाख ६० हजार रुपये किमतीचा ११६ ग्रॅम मेथॅक्यूलॉन हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला. बोनिफेस ईमोनिक असे त्या आफ्रिकन व्यक्तीचे नाव असून त्याच्यावर तळोजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा पोलिस अधिक तपास करत आहेत.