प्रशासकीय अध्यक्षांची उचलबांगडी
By Admin | Updated: December 21, 2014 00:59 IST2014-12-21T00:59:47+5:302014-12-21T00:59:47+5:30
मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या प्रशासकीय मंडळाच्या अध्यक्षपदावरून मनोज सौनीक यांची उचलबांगडी करण्यात आली आहे.

प्रशासकीय अध्यक्षांची उचलबांगडी
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या प्रशासकीय मंडळाच्या अध्यक्षपदावरून मनोज सौनीक यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर माजी सचीव डी. बी. गोसावी यांची नियुक्ती केली आहे. तीन आठवड्यांत दोन अध्यक्ष झाल्याने बाजारसमिती परिसरात नाराजी आहे.
बाजारसमितीच्या संचालक मंडळाची दुसऱ्यांदा दिलेली वाढीव मुदत २ डिसेंबरला संपली. यानंतर पणन संचालक सुभाष माने यांनी प्रशासकाची नियुक्ती केली. प्रशासकीय अध्यक्षांच्या अध्यक्षपदी मनोज सौनीक व सदस्यपदावर सुनील पवार व शरद जरे यांची निवड केली होती. या संचालक मंडळाने पुढील सहा महिन्यामध्ये निवडणूक कार्यक्रम राबविणे व रखडलेली कामे मार्गी लावणे आवश्यक होते. पणन संचालकांनी नुकतीच बैठक घेऊन विद्यमान सचीव सुधीर तुंगार यांना तत्काळ पदमुक्त करण्यात यावे अशा सुचना दिल्या होत्या. परंतु या आदेशाची अंमलबजावणी त्यांनी केली नाही. यामुळे तुंगार यांना पाठीशी घालत त्यांना तडकाफडकी अध्यक्षपदावरून दुर करण्यात आले आहे. त्यांच्या जागेवर एपीएमसीमध्ये यापुर्वी सहसचीव व सचीव पदावर काम केलेल्या डी. बी. गोसावी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गोसावी यांनी आज पदभार स्विकारला आहे.
बाजारसमितीमध्ये तीन आठवड्यात अध्यक्षाची बदली करण्यात आली आहे. याविषयी प्रतिक्रिया घेण्यासाठी मनोज सौनीक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की याविषयी मला काहीही माहिती नाही,असे सांगून याविषयावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. गोसावी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी नियुक्ती केल्यानंतर पदभार घेतला आहे.
कामकाजाविषयी माहिती घेतली जात असल्याचे सांगितले. गोसावी सचीवांना पदमुक्त करण्याचा आदेश काढणार का याविषयी व्यापारी आणि कामगारांमध्ये उत्सुकता लागून राहिली आहे. (प्रतिनिधी)
बदलीचा कित्ता गिरविला
पणन संचालक सुभाष माने यांना एपीएमसीच्या सचीव पदावर हजर होऊ न दिल्याने त्यांनी न्यायालयीन लढा दिला होता. पणन संचालक पदावरून दुर केल्यानंतरही त्यांनी न्यायालयीन लढा दिला व बदली चुकिची असल्याचे सांगितले. परंतु नियुक्त केलेल्या अध्यक्षांची तडकाफडकी बदली केली. यामुळे आता सौनी यांच्यावर अन्याय नाही का अशी प्रतिक्रिया मार्केट आवारातून व्यक्त केली जात आहे.