अतिक्रमण हटवण्यात प्रशासन अपयशी

By Admin | Updated: May 30, 2017 06:32 IST2017-05-30T06:32:26+5:302017-05-30T06:32:26+5:30

एपीएमसी परिसरातील मोकळ्या भूखंडावर अनधिकृत झोपड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. सदर भूखंड सिडकोच्या ताब्यात असल्याने

Administration failures to remove encroachments | अतिक्रमण हटवण्यात प्रशासन अपयशी

अतिक्रमण हटवण्यात प्रशासन अपयशी

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : एपीएमसी परिसरातील मोकळ्या भूखंडावर अनधिकृत झोपड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. सदर भूखंड सिडकोच्या ताब्यात असल्याने त्यावरील झोपड्यांवर सिडकोतर्फे अनेकदा कारवाया करण्यात आल्या आहेत. त्यानंतरही कायस्वरूपी हा भूखंड मोकळा करण्यात सिडकोचे अतिक्रमण विरोधी पथक अपयशी ठरत असल्याचे दिसत आहे.
एपीएमसी सेक्टर १९ ए मधील ७ क्रमांकाच्या भूखंडावर मोठ्या प्रमाणात अनधिकृत झोपड्या निर्माण झाल्या आहेत. अनेक वर्षांपासून हा भूखंड अतिक्रमणच्या विळख्यात सापडला असून दिवसेंदिवस त्यावरील अतिक्रमण वाढतच चालले आहे. त्याठिकाणी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींचे देखील वास्तव्य असून, त्यांच्याकडून उघडपणे गांजा विक्री होत आहे. याप्रकरणी पोलिसांनी अनेकदा संबंधितांवर कारवाई देखील केलेली आहे. परंतु कारवाईनंतर देखील झोपड्यांच्या आडून त्याठिकाणी अमली पदार्थांची विक्री केली जात आहे. यामुळे सदर ठिकाणची झोपडपट्टी पोलिसांची देखील डोकेदुखी ठरत आहे. यामुळे गुन्हेगारीचे केंद्रस्थान ठरणारी त्याठिकाणची अनधिकृत झोपडपट्टी प्रशासनाने कायमची हटवावी अशी पोलिसांची देखील मागणी आहे. परंतु अनेकदा कारवाया करून देखील सिडको प्रशासनाला त्याठिकाणची झोपडपट्टी हटवण्यात अपयश आलेले आहे. यामुळे वारंवार कारवाईसाठी केला जाणार खर्च व्यर्थ जात असल्याचा संताप नागरिकांकडून व्यक्त होत आहे. शिवाय प्रशासनच त्यांच्या ताब्यातील भूखंडावरील अतिक्रमण हटवण्यात अपयशी ठरत असल्यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
यापूर्वी स्थानिक नगरसेविका व विद्यमान स्थायी समिती सभापती शुभांगी पाटील यांनी देखील या झोपड्यांवर कारवाई होत नसल्याचा संताप यापूर्वी सभागृहात व्यक्त केलेला आहे. त्यामुळे भूमिपुत्रांच्या गरजेपोटी बांधकामांवर कारवाई करणारे प्रशासन अनधिकृत झोपड्या हटवण्यात मात्र हतबल होत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी हा भूखंड देखील झोपड्यांच्या माध्यमातून भूमाफियांच्या घश्यात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Web Title: Administration failures to remove encroachments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.