उद्घाटनाविनाच ‘आदर्श आगार’ खुले
By Admin | Updated: May 29, 2016 03:12 IST2016-05-29T03:12:08+5:302016-05-29T03:12:08+5:30
उद्घाटनापूर्वीच चर्चेचा विषय ठरलेले घणसोलीतील आदर्श आगार अखेर उद्घाटनाविनाच वापरासाठी खुले करण्यात आले आहे. या आगारातून तूर्तास चार मार्गांवर बस धावत असून, आठवडाभरात

उद्घाटनाविनाच ‘आदर्श आगार’ खुले
नवी मुंबई : उद्घाटनापूर्वीच चर्चेचा विषय ठरलेले घणसोलीतील आदर्श आगार अखेर उद्घाटनाविनाच वापरासाठी खुले करण्यात आले आहे. या आगारातून तूर्तास चार मार्गांवर बस धावत असून, आठवडाभरात पूर्ण क्षमतेने आगार वापरासाठी खुले होणार आहे. आगाराच्या उद्घाटनात प्रोटोकॉल पाळण्याच्या आयुक्तांकडून सूचना आल्यामुळे उद्घाटन आजी की माजी पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार, यावरून राजकीय वातावरण तापले होते.
महापालिकेची परिवहन सेवा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने घणसोली सेक्टर १५ येथे ९.५ एकर जागेत आगार उभारण्यात आले आहे. डिसेंबर २०१४ मध्ये या आगाराच्या बांधकामाला सुरुवात झाली होती. त्याकरिता ठेकेदाराला मार्च २०१६ अखेरपर्यंतची मुदत देण्यात आलेली. त्यानुसार नुकतेच आगाराचे काम पूर्ण होताच त्याच्या उद्घाटनाच्या हालचाली प्रशासनाने चालवल्या होत्या. परंतु आगाराच्या उद्घाटनात निमंत्रित पाहुण्यांच्या बाबतीत प्रोटोकॉल पाळण्याच्या सूचना पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिल्या होत्या. त्यामुळे माजी पालकमंत्री गणेश नाईक यांच्याऐवजी विद्यमान पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन होण्याची शक्यता निर्माण झालेली. यामुळे शहरातले राजकीय वातावरण तापून राष्ट्रवादी विरुद्ध आयुक्त मुंढे असे चित्र निर्माण झाले होते.
यामुळे आदर्श आगाराकडे सर्वांचे लक्ष लागलेले असतानाच २६ मेपासून हे आगार वापरासाठी खुले करण्यात आले आहे. त्यामागची खेळी प्रशासनाची की सत्ताधाऱ्यांची, हे मात्र उघड होऊ शकलेले नाही. सद्य:स्थितीला या आगारातून चार ते पाच मार्गांवर बस चालवल्या जात असल्याचे सूत्रांकडून समजले. मात्र अवघ्या सात ते आठ दिवसांत पूर्ण क्षमतेने आगारातून सर्वच प्रस्तावित मार्गांवर बस सोडल्या जाणार आहेत. काही दिवसांपूर्वीच महापालिका परिवहनच्या ताफ्यात नव्या मिडी बस आलेल्या आहेत.
घणसोली आगारातून सुरू असलेल्या मार्गावर त्याच गाड्यांचा वापर होत आहे. परंतु येत्या काही दिवसांत इतर प्रमुख मार्गांवर धावणाऱ्या एनएमएमटीच्या गाड्या घणसोली आगारातून निश्चित मार्गांवर सोडल्या जाणार आहेत.