नियम मोडणाऱ्यांवर कारवाई
By Admin | Updated: December 22, 2015 00:39 IST2015-12-22T00:39:43+5:302015-12-22T00:39:43+5:30
वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून अतिवेग व अतिआवाजात रस्त्यावर वाहने चालविणाऱ्या एक हजार ५७७ व्यक्तींवर गेल्या सहा दिवसांत जिल्ह्यात विविध ठिकाणी कायदेशीर कारवाई केली

नियम मोडणाऱ्यांवर कारवाई
जयंत धुळप, अलिबाग
वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून अतिवेग व अतिआवाजात रस्त्यावर वाहने चालविणाऱ्या एक हजार ५७७ व्यक्तींवर गेल्या सहा दिवसांत जिल्ह्यात विविध ठिकाणी कायदेशीर कारवाई केली. त्यांच्याकडून १ लाख ६२ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
रायगडचे जिल्हा पोलीस अधीक्षक मो.सुवेझ हक यांनी गेल्या पंधरा दिवसांपूर्वी एका विशेष बैठकीत जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. वाहतूक नियमांचे उल्लंघन करुन अधिक वेग आणि आवाजाच्या वाहनांमुळे ज्येष्ठ नागरिकांना रस्त्यावरुन चालताना जीव मुठीत धरुनच चालावे लागत असल्याची समस्या यावेळी ज्येष्ठ नागरिकांनी हक यांच्यासमोर मांडली होती. त्याची गंभीर दखल घेऊन खातरजमा करुन रायगड जिल्हा पोलीस वाहतूक शाखेस याबाबत कारवाई करण्याचे आदेश हक यांनी दिले. त्यानुसार जिल्ह्यात ही कारवाई करण्यात येत आहे.
ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याकरिता जिल्हा पोलीस अधीक्षक मो.सुवेझ हक यांनी विशेष बैठक आयोजित करुन जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. त्या बैठकीतील बेदरकार आणि वाहतुकीचे नियम तोडून चालणाऱ्या वाहनांच्या समस्येची त्यांनी तत्काळ दखल घेऊन कारवाई सुरू केली आहे.
माझ्या आठवणीत अशा प्रकारे ज्येष्ठ नागरिकांना विचारात घेवून, त्यांची समस्या सोडवण्याकरिता पोलीस विभागाकडून प्रथम ठोस कारवाई होत आहे, हे आम्हा ज्येष्ठ नागरिकांकरिता निश्चितच आनंददायी असून आम्ही मनापासून रायगड पोलिसांचे आभार मानून, त्यांचे अभिनंदन करतो अशी प्रतिक्रिया अलिबाग ज्येष्ठ नागरिक संस्थेचे अध्यक्ष ल. नी. नातू यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.