बेकायदा रेतीउपशावरील कारवाई नाटकी ?
By Admin | Updated: October 5, 2015 00:19 IST2015-10-05T00:19:43+5:302015-10-05T00:19:43+5:30
ठाण्यात कोलशेत, नागलाबंदर, कावेसर, गायमुख, घोडबंदर, मुंब्रा, दिवा खाड्यांतून रेतीउपसा करण्याचा व्यवसाय केला जातो.

बेकायदा रेतीउपशावरील कारवाई नाटकी ?
घोडबंदर : ठाण्यात कोलशेत, नागलाबंदर, कावेसर, गायमुख, घोडबंदर, मुंब्रा, दिवा खाड्यांतून रेतीउपसा करण्याचा व्यवसाय केला जातो. तिच्या उत्खननासाठी महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाने निश्चित केलेल्या खोलीपेक्षा जास्त तसेच तीन मीटरच्या अधिक खोल जागेतून रेती काढणे आणि मर्यादित वेळेनुसारच ती काढण्यास मान्यता आहे. मात्र, हे नियम अटी-शर्ती पायदळी तुडवून बेकायदा उपसा सुरू असल्याने पर्यावरणाला मोठा धोका उत्पन्न झाला आहे. महसूल विभागाकडून रेकॉर्ड नोंदीसाठी घातलेल्या धाडी या तात्पुरती मलमपट्टी ठरत असल्याने हा व्यवसाय पुन्हा राजरोसपणे सुरू होत असल्याचे दिसून येत आहे.
कारवाईच्या धाडसत्रामुळे महसूल आणि पोलिसांचा हप्ता वाढण्यास हातभार लागत असल्याचे जाणकार सांगतात. देशात महागाईचा जोर वाढल्यामुळे रेती व्यवसायदेखील तेजीत आला आहे. मागील वर्षी असलेल्या दरात व या वर्षीच्या दरात मोठी तफावत आहे. मागील वर्षी खाडीच्या रेतीसाठी एका ट्रकला १२ हजार मोजावे लागत होते. त्यासाठी आता १८ हजारांहून अधिक रक्कम द्यावी लागत आहे. दर्जेदार बांधकामासाठी खाडीऐवजी नदीच्या रेतीला मान्यता आहे. तिचा दर सोन्याहून जास्त झाला आहे. तीन ते चार ब्रास साठी ४० ते ५० हजार रु पये आकारले जात आहेत. रेतीचे दर निश्चित नसल्याने मन मानेल असे दर उकळले जात आहेत. विशेष म्हणजे तिची वाहतूक करताना चिरीमिरी आणि हप्त्यांचे वाटप जेवढे जास्त, तसा दर वाढवला जात आहे. विनापरवाना रेती काढणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करून रेती काढण्यासाठी वापरलेले साहित्य जप्त करण्यात येते. बहुतेकवेळा गुन्हे दाखल करताना अज्ञात व्यक्तीविरोधातच ते दाखल करण्याची किमया साधली जाते. यामागे अर्थकारण दडले असल्याचा आरोप केला जात आहे.