एमआयडीसीतील बांधकामांवर कारवाई
By Admin | Updated: August 20, 2015 23:58 IST2015-08-20T23:58:41+5:302015-08-20T23:58:41+5:30
औद्योगिक वसाहतीमध्ये मोठ्या नाल्याच्या कडेला अनधिकृतपणे बांधलेल्या झोपड्या आणि दुकानांवर अखेर कारवाई करण्यात आली. शिवसेना

एमआयडीसीतील बांधकामांवर कारवाई
नवी मुंबई : औद्योगिक वसाहतीमध्ये मोठ्या नाल्याच्या कडेला अनधिकृतपणे बांधलेल्या झोपड्या आणि दुकानांवर अखेर कारवाई करण्यात आली. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दोन महिन्यांपासून यासाठी पाठपुरावा केला होता. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कारवाईचे आदेश दिल्यानंतर एमआयडीसी प्रशासनाने कारवाई केली.
नवी मुंबईमध्ये एमआयडीसी व सिडकोच्या जागेवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम केले जात आहे. बोनसरी परिसरात नाल्यावर भराव टाकून अनधिकृतपणे बांधकाम करण्यात आले होते. यामधील एका दुकानाचे उद्घाटनही करण्यात आले होते आणि त्याला राजकीय पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली होती. शिवसेना शाखाप्रमुख महेश कोठीवाले, माजी नगरसेवक रामाशेठ वाघमारे, संतोष नेटके यांनी या अतिक्रमणाविरोधात दोन महिन्यांपूर्वीच महापालिकेच्या नेरूळ विभाग कार्यालयात तक्रार केली होती. परंतु कारवाई न झाल्यामुळे अतिरिक्त आयुक्त व आयुक्तांकडेही तक्रार केली होती. एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांकडेही वारंवार पत्रव्यवहार केला होता. पालिका व एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन आणि घेराव घालूनही कारवाईस विलंब होत असल्यामुळे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली होती. पालकमंत्र्यांनी तत्काळ अनधिकृत बांधकाम हटविण्याचे आदेश दिले होते. पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर एमआयडीसी प्रशासनाने जोरदार हालचाली करून गुरुवारी बोनसरीतील अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली.