महिनाभरात ७५ हजार वाहनचालकांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 02:19 IST2021-02-13T02:19:15+5:302021-02-13T02:19:23+5:30
रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत वाहतूक पोलिसांची मोहीम

महिनाभरात ७५ हजार वाहनचालकांवर कारवाई
नवी मुंबई : अवघ्या एका महिन्यात ७५ हजार वाहनचालकांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त बिपिनकुमार सिंह यांनी दिली. वाशी येथे आयोजित संवाद व्यवस्थेशी या कार्यक्रमास ते प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचे महत्त्व पटवून देण्यात आले.
नवी मुंबई वाहतूक पोलिसांच्या वतीने ३२ वे रस्ता सुरक्षा अभियान राबवले जात आहे. या अभियानांतर्गत शुक्रवारी वाशी येथे संवाद व्यवस्थेशी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वाहतूक पोलिसांनी गतमहिन्यात तब्बल ७५ हजार वाहनचालकांवर कारवाई केली असल्याची माहिती पोलीस आयुक्त बिपिनकुमार सिंह यांनी दिली. वाहतुकीच्या नियमांबाबत पोलिसांकडून सातत्याने जनजागृती केली जात आहे. यानंतरही अनेकांकडून वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली होत आहे. यातून अपघातांनादेखील निमंत्रण मिळत असून अनेकांचे प्राणदेखील जात आहेत. परिणामी, अशा वाहनचालकांवर कारवाईचे पाऊल वाहतूक पोलिसांना उचलावे लागत आहे. त्यानुसार, विविध कलमांतर्गत गतमहिन्यात मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे. यावेळी कार्यक्रमास पालिका आयुक्त अभिजित बांगर, उपायुक्त पुरुषोत्तम कराड, पनवेल आरटीओ अधिकारी अभय देशपांडे, अमोल खैर, प्राचार्या शुभदा नायक, मानसोपचारतज्ज्ञ डॉ. विकास देशमुख हे देखील उपस्थित होते. त्यांनीदेखील उपस्थितांना रस्ते अपघातांच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले. वाहतूक पोलीस व नवी मुंबई प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने या चर्चासत्राचे आयॊजन करण्यात आले होते. त्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती.
वाहतुकीच्या नियमांबाबत वाहतूक पोलिसांकडून सातत्याने जनजागृती केली जात आहे. यानंतरही नियमांची पायमल्ली होत आहे.