ं‘तो’ आरोपी मोकाट!
By Admin | Updated: March 4, 2015 02:05 IST2015-03-04T02:05:17+5:302015-03-04T02:05:17+5:30
अश्लील हावभावांमुळे भेदरलेल्या दोन तरुणींनी रिक्षातून उडी घेतल्यानंतर याप्रकरणी फुलचंद गुप्ता (४३) या ढोकाळीच्या रिक्षाचालकाला नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे.

ं‘तो’ आरोपी मोकाट!
ठाणे : रिक्षाचालकाच्या संशयास्पद हालचाली आणि त्याने केलेल्या अश्लील हावभावांमुळे भेदरलेल्या दोन तरुणींनी रिक्षातून उडी घेतल्यानंतर याप्रकरणी फुलचंद गुप्ता (४३) या ढोकाळीच्या रिक्षाचालकाला नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, त्याने आपल्यावरील आरोपाचा इन्कार केला आहे. तपास आठ पथकांद्वारे सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या दोन मुली नौपाडा ते भिवंडी प्रवास करत होत्या. रिक्षाचालकाच्या अश्लील हावभावांमुळे त्या भेदरल्या. त्यांनी रिक्षा थांबवण्यास सांगितले. मात्र तरीही रिक्षाचालक भरधाव जात होता. त्यामुळे कॅडबरी उड्डाणपूलावर रिक्षा पोहोचताच त्यांनी रिक्षातून उडी मारली. त्या दोघीही जखमी झाल्या. स्वप्नाली लाड घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनीही या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी या मुलींनी केलेल्या वर्णनावरून रिक्षाचालकाचे रेखाचित्र काढले आहे. त्याच आधारे २ मार्च रोजी रात्री एका संशयिताला त्याला ताब्यात घेतले. त्या मुली रत्नागिरीला असल्यामुळे रिक्षाचालकाची ओळखपरेड अद्याप झालेली नसल्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पगारे यांनी ‘लोकमत’ला सांगितले
अशा प्रकरणांत रिक्षा आणि चालकाचे लायसन्स जप्त करण्याचे आदेश परिवहन विभागाला दिले आहेत. निकाल लागेपर्यंत हे लायसन्स जप्त राहतील. मात्र ही जबाबदारी गृह विभागाचीही आहे. त्यांनीही याकडे लक्ष द्यावे, असे मत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी व्यक्त केले.