कर्जत-कल्याण मार्गावर गतिरोधकांमुळे अपघात!
By Admin | Updated: June 2, 2016 01:38 IST2016-06-02T01:38:42+5:302016-06-02T01:38:42+5:30
कर्जत-कल्याण राज्यमार्गावर गेल्या महिनाभरापासून अनेक ठिकाणी नव्याने बेकायदा गतिरोधक टाकण्यात आले आहेत

कर्जत-कल्याण मार्गावर गतिरोधकांमुळे अपघात!
नेरळ : कर्जत-कल्याण राज्यमार्गावर गेल्या महिनाभरापासून अनेक ठिकाणी नव्याने बेकायदा गतिरोधक टाकण्यात आले आहेत. या नव्याने टाकण्यात आलेल्या गतिरोधकांवर पांढरे पट्टे ओढले नसल्याने या मार्गावर अपघातांची मालिकाच सुरु आहे. या नव्याने टाकण्यात आलेल्या गतिरोधकांचा वाहन चालकांना अंदाज येत नसल्याने येथे मोठ्या प्रमाणात वाहने आपटत असल्याने वाहनांचे नुकसान होऊन अपघातही घडत आहेत. एमएमआरडीएने या गतिरोधक टाकणाऱ्यांवर लवकर कारवाई करून ज्या ठिकाणी गतिरोधकांची आवश्यकता नाही असे गतिरोधक काढण्यात यावेत, अशी मागणी वाहनचालक व प्रवाशांकडून केली जात आहे.
कर्जत-कल्याण राज्यमार्ग कोट्यवधी रु पये खर्च करून तयार करण्यात आला आहे. या रस्त्यावर कर्जत ते शेलू वांगणी दरम्यान सुमारे ३०ते ३५ गतिरोधक टाकण्यात आले आहेत. अनेक गतिरोधक हे कोणतीही परवानगी न घेता अचानक टाकले असून त्यामुळे वाहन चालकांना त्यांचा अंदाज येत नसल्याने अचानक ब्रेक लावावा लागतो आणि त्यामुळे अपघात होत आहेत. ज्या ठिकाणी एखादे गाव, शाळा असेल तर गतिरोधक टाकणे गरजेचे आहे, परंतु गरज नसताना हे गतिरोधक कशासाठी असा प्रश्न वाहनचालक व प्रवाशांना पडला आहे. कोणतीच परवानगी न घेता जबरदस्तीने हे गतिरोधक टाकले आहेत. त्यामुळे वाहने जोरात आपटून वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
काही दिवसांपूर्वी याच राज्य मार्गावर शेलू, नेरळ व देऊळवाडी येथे टाकण्यात आलेल्या गतिरोधकामुळे अनेक छोटे-मोठे अपघात झाले आहेत. हे गतिरोधक असे आहेत की समोर आल्याशिवाय दिसत नाही. त्यामुळे वाहनचालकांना अचानक ब्रेक लावावा लागतो आणि त्यामुळे अपघात होतो. त्यामुळे याला जबाबदार कोण? असा ही प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे जेथे आवश्यकता नाही अशा ठिकाणी टाकण्यात आलेले गतिरोधक लवकरात लवकर काढण्यात यावेत, अशी मागणी प्रवासी व वाहनचालकांकडून केली जात आहे. (वार्ताहर)कर्जत-कल्याण रस्त्यावर कोणतीही परवानगी न घेता अनेकांनी जबरदस्तीने हे गतिरोधक टाकले आहेत ते काढण्यात येणार आहेत. त्यासाठी आम्ही नेरळ, कर्जत पोलीस स्टेशनमध्ये पोलीस संरक्षणासाठी पत्र दिले आहे. पोलिसांचे उत्तर मिळताच लगेच अनावश्यक ठिकाणी टाकण्यात असलेले गतिरोधक काढण्यात येतील.
- विनय सर्वे, उप अभियंता, एमएमआरडीएकर्जत-कल्याण राज्यमार्गावर आवश्यकता नसतानाही मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर गतिरोधक टाकले आहेत. ज्या ठिकाणी गतिरोधक टाकले आहेत तेथे पांढरे पट्टे ओढले नसल्याने वाहन चालकांना अंदाज येत नाही आणि त्यामुळे अपघात होत आहेत. त्यामुळे आवश्यकता नसेल अशा ठिकाणी टाकण्यात असलेले गतिरोधक काढण्यात यावेत, जेणेकरून अपघात होणार नाही.
- किशोर गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते, डिकसळ