अवैध व्यवसायाचे शहराला ग्रहण; झोपडींमध्ये जुगाराचे अड्डे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2019 11:41 PM2019-09-08T23:41:46+5:302019-09-08T23:42:02+5:30

अवैध दारूविक्रीच्या अड्ड्यांनाही अभय

Accept City of Illegal Businesses; Gambling bases in huts | अवैध व्यवसायाचे शहराला ग्रहण; झोपडींमध्ये जुगाराचे अड्डे

अवैध व्यवसायाचे शहराला ग्रहण; झोपडींमध्ये जुगाराचे अड्डे

Next

सूर्यकांत वाघमारे 

नवी मुंबई : अनधिकृत झोपड्ड्यांमुळे नवी मुंबईत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. बहुतांश झोपड्यांमध्ये जुगारांच्या अड्ड्यांसह देशी दारूची विक्री होताना दिसत आहे. मात्र, अनधिकृत झोपड्यांचे साम्राज्य मोडीत काढण्यात पालिका व सिडको प्रशासन अपयशी ठरत असल्याने त्या ठिकाणी चालणाऱ्या अवैध धंद्यांच्या जाळ्यात स्मार्ट सिटी अडकत चालली आहे.

वाढते आयटी क्षेत्र आणि विकसित होणारे नागरीकरण यामुळे देशपातळीवर नवी मुंबईला स्मार्ट सिटी म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. यामुळे शहराची उंचावलेली प्रतिमा शहरातील वाढत्या अवैध धंद्यांमुळे मलीन होत चालली आहे.

शहरातील सिडकोच्या ताब्यातील बहुतांश भूखंड अद्यापही वापराविना पडून आहेत, तर काही भूखंड ज्या सोयी-सुविधांसाठी राखीव ठेवले आहेत, त्यांचा अद्याप विकास होऊ शकलेला नाही. अशा भूखंडांवर भूमाफियांनी कब्जा मिळवून झोपड्यांचे साम्राज्य उभारले आहे. अशाच प्रकारे गावठाणांभोवतीच्या मोकळ्या जागेतही झोपड्या पाहायला मिळत आहेत. त्यापैकी बहुतांश ठिकाणी अवैध धंद्यांना थारा मिळत आहे. गांजाविक्री, जुगाराचे अड्डे यासह देशी दारूविक्रीचे धंदे त्या ठिकाणी चालत आहेत. यामुळे परिसरात सातत्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असून रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.

एपीएमसी सेक्टर १९ येथील मोकळ्या भूखंडावरील झोपड्यांमध्ये गांजाची विक्री होत आहे. त्यावर अनेकदा पोलिसांनी कारवाई केलेली असून, झोपड्यांवरही प्रतिवर्षी कारवाई होत आहे; परंतु हा भूखंड कायमस्वरूपी मोकळा करण्यात प्रशासन अपयशी होत आहे. तर नेरुळ येथील बालाजी टेकडी परिसरातील झोपड्यांमुळे लगतच्या रहिवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. झोपड्यांमध्ये वेश्याव्यवसाय चालत असल्याने, रात्री-अपरात्री त्या ठिकाणी येणारे गर्दुल्ले रस्त्यावरच बसलेले असतात. त्यांच्याकडून महिला, मुलींची छेड काढण्याचेही प्रकार घडत असल्याने अनेकांना घराबाहेर निघणे असुरक्षित वाटू लागले आहे. नेरुळ गावामध्ये भाड्याच्या घरामध्ये सफाई कामगाराकडून मोठा जुगाराचा अड्डा चालवला जात होता. सध्या तिथे बांधकाम सुरू असल्याने तूर्तास त्याने अड्डा इतरत्र हलवल्याचे समजते. अशाच प्रकारे कोपरखैरणे गावाच्या मागच्या बाजूस झोपडींमध्ये क्लब चालवला जात आहे. दीड वर्षापूर्वी त्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात गावठी दारूसाठा जप्त केला होता. त्याचप्रमाणे घणसोली गावातही भाड्याच्या जागेत जुगार सुरू असून, कोपरखैरणे सेक्टर १२ डी येथील झोपडींमध्येही मोठ्या प्रमाणात अवैध धंदे चालत आहेत. मात्र, गणेशोत्सवात बहुतांश मंडळांमध्ये जुगार चालत असल्याने हे मोठमोठे अड्डे काही दिवसांसाठी बंद करण्यात आले असल्याचेही सूत्रांकडून समजते.

कोपरखैरणे सेक्टर १२ डी येथील झोपडींमधील अवैध धंद्यांमुळे परिसरातील रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रात्री-अपरात्री त्या ठिकाणी हाणामारीच्या घटना घडत आहेत.
मद्यधुंद अवस्थेत रस्त्याने फिरणाºया गर्दुल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे; परंतु पोलिसांसह पालिकेकडे सातत्याने तक्रार करूनही तिथल्या अवैध धंद्यांना लगाम लागत नसल्याचा व झोपडी हटवल्या जात नसल्याचा आरोप प्रभाधिनी दर्शन सोसायटीमधील रहिवाशांकडून केला

जात आहे.बोनकोडे, कोपरखैरणे येथे झोपडींमध्ये मोठ्या प्रमाणात जुगाराचे अड्डे चालत असून दारूची विक्री होत आहे. यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार केल्यास संबंधिताला तक्रारदाराची माहिती दिली जाते. शिवाय, कारवाईतही चालढकल केली जाते. यामुळे अवैध धंद्यांना थारा मिळत असून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. - प्रदीप म्हात्रे, स्थानिक नागरिक

Web Title: Accept City of Illegal Businesses; Gambling bases in huts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.