तांबाठीच्या फरार उपसरपंचाची ग्रामसेवकाने लावली हजेरी
By Admin | Updated: November 11, 2014 22:57 IST2014-11-11T22:57:08+5:302014-11-11T22:57:08+5:30
खालापूर तालुक्याच्या तांबाठी ग्रामपंचायतीचे उपसरपंच खंडणीच्या गुन्हय़ाखाली तब्बल चार महिन्यांपासून फरार आहेत.

तांबाठीच्या फरार उपसरपंचाची ग्रामसेवकाने लावली हजेरी
अमोल पाटील ल्ल खालापूर
खालापूर तालुक्याच्या तांबाठी ग्रामपंचायतीचे उपसरपंच खंडणीच्या गुन्हय़ाखाली तब्बल चार महिन्यांपासून फरार आहेत. असे असताना पंचायतीच्या मासिक सभेला फरार उपसरपंच याने हजेरी लावल्याने तालुक्यात जोरदार चर्चा सुरु आहे. केवळ हजेरी लावण्यासाठी उपस्थित झालेल्या उपसरपंचाला ग्रामसेवकाने हजेरीसाठी मदत केल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी पोलिसांकडून संबंधित ग्रामसेवकाची चौकशी करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेनेही या प्रकरणाची दखल घेतली असून ग्रामसेवकाची चौकशी करणार असल्याचे सांगितले आहे.
तालुक्यातील श्रीमंत समजल्या जाणा:या तांबाठी ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच संदेश पाटील यांच्यावर जुलै महिन्यात उत्तम स्टील कंपनीच्या एका ठेकेदाराकडून खंडणी घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. त्या दिवसापासून उपसरपंच पाटील फरार आहेत. जिल्हा न्यायालय आणि मुंबई उच्य न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला असून गेली चार महिने फरार आरोपीच्या मागावर खालापूर पोलीस आहेत. दरम्यान सलग तीन मासिक सभेला उपसरपंचाची गैरहजेरी लागल्याने त्याचे सदस्यत्व रद्द होण्याचा धोका निर्माण झाला असताना 7 नोव्हेंबरला झालेल्या ग्रामपंचायतीच्या मासिक सभेला फरार आरोपी पाटील हा उपस्थित राहिल्याने सर्वच सदस्य चक्रावून गेले होते. ग्रामसेवकांच्या म्हणण्यानुसार उपसरपंच पंचायतीमध्ये येऊन नोंदवहीत हजेरी लावून दोनच मिनिटात निघून गेले.
याप्रकरणी ग्रामसेवकाकडे संशयाची सुई असून परिसरात याबाबत जोरदार चर्चा आहे. उपसरपंच पाटील फरार आहे याची पूर्ण कल्पना ग्रामसेवकांना असतानाही हजेरी लावण्यासाठीची संपूर्ण तयारी उपसरपंच येण्यापूर्वी केल्याची माहिती समोर येत आहे. उपसरपंचाचे सदस्यत्व रद्द होऊ नये, यासाठी वेगवेगळय़ा शासकीय क्लृप्त्या ग्रामसेवकाने वापरून आरोपीला सहकार्य करण्याचे काम केल्याचा आरोप परिसरातील नागरिकांकडून केला जात आहे. खंडणीसारख्या गुन्हय़ात चार महिन्यांपासून फरार आरोपीला पाठीशी घालण्याचे काम केल्याची चर्चा असल्याने ग्रामसेवकाची चौकशी होणार आहे.
उपसरपंच संदेश पाटील हे सलग तीन मासिक बैठकींना गैरहजर होते. मागील महिन्यात पाटील यांनी खाजगी कारण देत रजेचा अर्ज दिला. आणि त्यांची रजा मंजूर देखील झाली आहे. शुक्र वारी(7 नोव्हेंबर) झालेल्या मासिक बैठकीसाठी सकाळी पाटील ग्रामपंचायतीमध्ये आले होते. यावेळी ते हजेरी लावून अवघे दोन मिनिट थांबून तत्काळ निघून गेले.
- प्रमोद पाटील,
ग्रामसेवक, तांबाठी ग्रामपंचायत
खालापूर पोलीस ग्रामसेवकाची चौकशी करणार असल्याचे पोलीस निरीक्षक यांनी सांगितल्यानंतर जिल्हा परिषद देखील या प्रकरणात संबंधितांची चौकशी करणार असल्याचे सूत्रंनी सांगितले.