दिवाळीनिमीत्त महानगरपालिकेची विशेष रात्रसफाई मोहीम, २३ टन कचरा केला संकलीत
By नामदेव मोरे | Updated: October 25, 2022 18:34 IST2022-10-25T18:33:52+5:302022-10-25T18:34:37+5:30
नवी मुंबई महानगरपालिकेचा स्वच्छतेमध्ये देशात तीसरा क्रमांक आला आहे.

दिवाळीनिमीत्त महानगरपालिकेची विशेष रात्रसफाई मोहीम, २३ टन कचरा केला संकलीत
नवी मुंबई : दिवाळीनिमीत्त नवी मुंबई महानगरपालिकेने रात्रीची विशेष स्वच्छता मोहीम राबविली. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री ११ ते पहाटे तीनपर्यंत दिघा ते सीबीडी पर्यंत ३५६ स्वच्छता दूतांनी २३ टन कचरा संकलीत केला. फटाक्यांमुळे निर्माण झालेला कचरा रात्रीमध्येच साफ केल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
नवी मुंबई महानगरपालिकेचा स्वच्छतेमध्ये देशात तीसरा क्रमांक आला आहे. राज्यातील सर्वात स्वच्छ शहर म्हणूनही ओळख आहे. शहर स्वच्छतेसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. याचाच भाग म्हणून लक्ष्मीपुजनाच्या दिवशी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. फटाक्यांमुळे शहरात कचऱ्याचे प्रमाण वाढत असते. इतर कचराही निर्माण हाेत असतो. हा कचरा साफ करण्यासाठी ३५६ स्वच्छता दुतांची नेमणूक करण्यात आली होती. त्यांना ८ पिकअप वहाने व ८ आरसी वाहने उपब्ध करून दिली होती. सर्व ८ विभागांमधील मुख्य रस्ते, वर्दळीची ठिकाणे, बाजारपेठा, मुख्य चौक अशा गजबजलेल्या ठिकाणी रात्री ११ पासून कचरा संकलीत करण्यास सुरुवात करण्यात आली. पहाटे ३ पर्यंत हार, फुले असा ८ टन ओला कचरा, कागद, पुट्टे, कापड असा १५ टन सुका कचरा संकलीत करण्यात आला.
सकाळी दिवस उजाडण्याच्या अगोदरच सर्व कचरा साफ झाल्याचे पाहून नागरिकांनीही समाधान व्यक्त केले. मनपा आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली घनकचरा विभागाचे उपायुक्त बाबासाहेब राजळे, मुख्य स्वच्छता अधिकारी राजेंद्र सोनवणे यांच्यासह इतर स्वच्छता अधिकारी या मोहिमेवर लक्ष ठेवून होते. मनपाच्या उपक्रमाविषयी शहरवासीयांनी समाधान व्यक्त केले आहे.