प्रेमसंबंधातून अल्पवयीन मुलगी बनली आई
By सूर्यकांत वाघमारे | Updated: March 27, 2024 20:15 IST2024-03-27T20:15:41+5:302024-03-27T20:15:57+5:30
गुन्हा दाखल : घरच्यांच्या विरोधानंतरही केले मंदिरात लग्न.

प्रेमसंबंधातून अल्पवयीन मुलगी बनली आई
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : घरच्यांचा विरोध डावलून अल्पवयीन मुलीने संसार थाटून तिने मुलीला जन्म दिल्याची घटना उरण परिसरात घडली आहे. सदर अल्पवयीन मुलगी प्रसूतीसाठी रुग्णालयात गेली असता डॉक्टरांमार्फत पोलिसांना माहिती मिळाली. त्यानुसार २१ वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उरण परिसरात राहणाऱ्या १३ वर्षीय मुलीचे २० वर्षीय मुलासोबत प्रेमसंबंध होते. मात्र दोघांचेही वय कमी असल्याने मुलीच्या कुटुंबीयांनी त्यांना विरोध केला होता. यानंतरही दोघांनी लग्नाची इच्छा व्यक्त करत घरच्यांच्या मर्जी विरोधात जाऊन मंदिरात लग्न केले होते. त्यानंतर मागील एक वर्षांपासून दोघे वेगळे राहत होते. तर इच्छेविरोधात लग्न केल्याने मुलीच्या घरच्यांनीही तिच्याशी संपर्क तोडला होता. दरम्यान दोन दिवसांपूर्वी सदर अल्पवयीन मुलगी प्रसूतीसाठी रुग्णालयात गेली असता ती अल्पवयीन असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनात आले. यामुळे त्यांनी पोलिसांना कळवले असता उरण पोलिसांनी अधिक चौकशी करून तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान अल्पवयीन मुलीने मुलीला जन्म दिला असून दोघांची प्रकृती ठिक असल्याचे पोलिसांनी सांगितले. काही दिवसांपूर्वीच तुर्भे एमआयडीसी परिसरात देखील एक अल्पवयीन मुलगी गरोदर असल्याचे समोर आले होते. त्यानंतर हि दुसरी घटना समोर आल्याने अल्पवयीन मुलांमधील लैंगिक संबंधाच्या घटना पालकांसाठी चिंतेची बाब ठरत आहेत.