75 वर्षीय जेष्ठ नागरिकाचे सुमारे 30 लाख बँकेकडून एलआयसीकडे वळते?
By वैभव गायकर | Updated: December 22, 2023 17:11 IST2023-12-22T17:11:15+5:302023-12-22T17:11:36+5:30
वृद्धांसोबत युवासेनेची आयडीबीआय बँकेत धडक.

75 वर्षीय जेष्ठ नागरिकाचे सुमारे 30 लाख बँकेकडून एलआयसीकडे वळते?
पनवेल: तालुक्यातील रोहिंजन गावातील 75 वर्षीय जेष्ठ नागरिकाची आयडीबीआय खारघर शाखेतील तत्कालीन महिला अधिकाऱ्याकडून 30 लाखाची फसवणूक केल्याचा आरोप करीत दि.22 रोजी फसवणुक झालेल्या जेष्ठ नागरिकासह युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बँकेत धडक देत बँक प्रशासनाला जाब विचारला. दोन ते तीन महिन्यांपूर्वी हा प्रकार घडला असल्याची माहिती युवा सेनेचे पदाधिकारी अवचित राऊत यांनी दिली. मात्र बँक प्रशासन संबंधित व्यक्तीला जुमानत नसल्याने आज युवासेनेच्या पदाधिकाऱ्यानी येथील बँकेचे व्यवस्थापक अनिल गौतम यांची भेट घेत त्यांना याबाबत विचारला आहे.
फसवणूक झालेले जेष्ठ नागरिक पंढरीनाथ काशिनाथ पाटील यांच्या आयडीबीआय खारघर शाखेतील बँकेमध्ये असलेले 30 लाख 54000 रुपये दि.6 जुन 2022 ची एफडी मॅच्युअर झाल्यामुळे ती पुन्हा सक्रीय करुन तिची मुदत वाढविण्याच्या नावाखाली तात्कालीन बँकेतील महीला अधिकाऱ्याने स्वाक्षरी घेऊन सदर रक्कम एलआयसी जीवन अक्षय या योजनेमध्ये वळवून खातेधारकाची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात येत आहे.
याची माहिती मिळताच युवासेना उपजिल्हा अधिकारी अवचित राऊत, शिवसेना उपमहानगर संघटक सुनीत पाटील, तलोजा शहर समन्वयक विलास पवार, उपशाखा प्रमुख कुंदन पाटील, युवासेना उपविधानसभा अधिकारी अनिकेत पाटील, युवासेना प्रभाग अधिकारी निखिल पानमंद, युवासैनिक राजेश लवंड, अश्विन ससाने, योगेश महाले, विशाल लोखंडे, रामनाथ पाटील, संतोष वाघे आदींनी बँकेच्या व्यवस्थापकांची भेट घेऊन लवकरात लवकर सदर जेष्ठ नागरिकाचे कष्टाचे पैसे त्याच्या खात्यात पुन्हा जमा करावेत अन्यथा शिवसेना युवासेना वतीने आपल्या बँकेविरुद्ध तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.