नवी मुंबई : कृषी पणन मंडळाच्या नवी मुंबईतील वीकिरण सुविधा केंद्रातून १७ दिवसांत ८३१ टन आंबा निर्यात झाला आहे. अमेरिकेला सर्वाधिक ३७२ टन आंबा रवाना झाला असून, गुजरात व दक्षिणेकडील राज्यांमधील निर्यातदारांनाही या केंद्राचा लाभ होत आहे.
फळे व भाजीपाला निर्यातीला चालना देण्यासाठी राज्य कृषी पणन मंडळाने नवी मुंबईमध्ये अत्याधुनिक विकिरण सुविधा उपलब्ध केली आहे.
अमेरिका, ऑस्ट्रेलियासह जगभरातील महत्त्वाच्या देशांमध्ये निर्जुंतुकीकरणाचे सर्व निकष पाळून आंबा निर्यातीची सुविधा येथे उपलब्ध आहे. १ एप्रिलपासून प्रत्यक्षात निर्यात सुरू झाली आहे.
अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी याठिकाणी आंब्याची गुणवत्ता तपासण्यासाठी आले असून, त्यांनी हिरवा कंदील दिल्यानंतरच आंबा निर्यात केला जात आहे. दोन आठवड्यांत आयएफसी प्रक्रिया करून तब्बल ३७२ टन आंबा अमेरिकेला निर्यात केला आहे.
उद्दिष्ट ४ हजार टनांचे
आयएफसी प्रक्रिया करून एकूण ३८३, व्हीएचटी प्रक्रिया करून ४.३९ टन व व्हीपीएफ प्रक्रिया करून ४४३, असा एकूण ८३१ टन आंबा निर्यात केला आहे.
यावर्षी ४ हजार टन निर्यातीचे उद्दिष्ट असून, ते पूर्ण करण्यासाठी पणन मंडळाच्या माध्यमातून निर्यातदारांना आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
१ ते १७ एप्रिलदरम्यानची निर्यात
अमेरिका - ३७२ टन
युके - ३२७.६४ टन
इतर युरोपीयन देश - ११५.९३ टन
ऑस्ट्रेलिया - ११.८४ टन
न्यूझीलंड - ४.३९ टन
पणनच्या केंद्राला सर्वाधिक पसंती
देशात पाच केंद्रांमधून विकिरण प्रक्रिया करून आंबा निर्यात केला जात आहे. यापैकी सर्वाधिक पसंती पणन मंडळाच्या नवी मुंबईतील केंद्राला मिळत आहे.
येथे व्हीपीएफ व व्हीएचटी सुविधा केंद्र आहे. महाराष्ट्रासह गुजरात व दक्षिणेकडील राज्यामधील निर्यातदारांनीही त्यांच्याकडील आंबा या केंद्रावरून निर्यात करण्यास पसंती दिली आहे.