कोरोनाबळींमध्ये ८० टक्के पन्नाशीच्या पुढील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 00:28 IST2021-04-20T00:25:43+5:302021-04-20T00:28:19+5:30
ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक धोका : नवी मुंबई वर्षभरात १०० तरुणांचाही झाला मृत्यू

कोरोनाबळींमध्ये ८० टक्के पन्नाशीच्या पुढील
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : कोरोनाबळींची संख्या नवी मुंबईमध्येही वाढू लागली आहे. आतापर्यंत १२६८ जणांचा मृत्यू झाला आहे. ८० टक्के मृत्यू पन्नाशीच्या पुढील असून त्यांचा आकडा १०२३ एवढा आहे. यामुळे मनपा प्रशासनाने ज्येष्ठ नागरिकांवरील उपचारावर विशेष लक्ष दिले आहे. तरुणांमध्येही मृत्यूचा धोका वाढत असून आतापर्यंत तब्बल १०० तरुणांचा मृत्यू झाला आहे. दहा वर्षांच्या आतील दोन जणांचाही कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
कोराेनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्युदर वाढू लागला असल्यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. प्रतिदिन ५ ते ९ जणांचा मृत्यू होत आहे. आयसीयू व व्हेंटिलेटर्सची कमतरता असल्यामुळे अनेकांना वेळेवर उपचार मिळत नाहीत व अनेकांना जीव गमवावा लागत आहे. महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी मृत्युदर रोखण्यावर विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. वयोगटानुसार मृत्युदराचेही सर्वेक्षण करण्यात येत आहे.
मृतांमध्ये ज्येष्ठ नागरिक व सहव्याधी असणारांचा सर्वाधिक समावेश आहे. एकूण मृत्यूपैकी ८० टक्के पन्नाशीच्या पुढील असल्याचे निदर्शनास आले आहे. ४० ते ५० वयोगटांतील १४३ जणांचा मृत्यू झाला आहे. ५० ते ६० वयोगटांतील ३१६ जणांचा व ६० ते ७० वयोगटातील ३६४ जणांचा मृत्यू झाला आहे. ७० ते ८० वयोगटातील २४९ जणांचा मृत्यू झाला आहे. ८० ते १०० वयोगटातील ९४ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.
ज्येष्ठ नागरिकांमधील मृत्यूचे प्रमाण वाढत असल्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने त्यांच्यावरील उपचारावर विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. पन्नाशीच्या पुढील सर्व रुग्ण मनपाच्या निगराणीखाली असणार आहेत. त्यांच्या प्रकृतीवर नियमित देखरेख केली जाणार असून मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. तरुणांमध्येही मृत्यूचे प्रमाण दुर्लक्ष करण्यासारखे नाही.
आतापर्यंत ११ ते ४० वयोगटातील १०० जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यामुळे व वेळेत चाचणी करून उपचार सुरू न केल्यामुळे अनेक तरुणांचा मृत्यू होत आहे.