नवी मुंबई : दक्षिण-पश्चिम रेल्वेच्या कॅसलरॉक-कुलेम घाट विभागात ट्रॅक नूतनीकरण कामासाठी २८ एप्रिल ते ७ जून दरम्यान दररोज सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत पाच तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्याचा परिणाम गोवा मार्गावरील रेल्वे सेवांवर होणार असून, आठ एक्स्प्रेस अंशतः रद्द होणार आहेत. तर, ४ गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात येणार आहेत. याचा फटका गोवा मार्गावरील प्रवाशांना बसणार आहे.
शालिमार-वास्को दा गामा (१८०४७/४८), तिरुपती/हैदराबाद-वास्को (१७४१९/२०, १७०२१/२२), सिकंदराबाद-वास्को (१७०३९/४०) तसेच जैसिदीह-वास्को (१७३२१/२२) या प्रमुख गाड्यांच्या फेऱ्यांवर परिणाम होणार आहे.
संबंधित तारखांना या गाड्या वास्को-हुबळी दरम्यान रद्द राहतील. परिणामी, या गाड्यांचा प्रवास हुबळी येथेच अल्पावधीत संपवण्यात येईल, तर परतीच्या फेऱ्या हुबळीहूनच नियोजित वेळेत सुटतील. त्यामुळे गोवा, कर्नाटक व दक्षिण भारताकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठा फटका बसणार आहे.
वास्को-वेलंकन्नी गाड्यांचेही मार्गांतर
वास्को दा गामा-वेलंकन्नी (१७३१५/१६) साप्ताहिक गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आले आहेत. या गाड्या मडगाव-मंगलुरू-शोरनूर-एरोड मार्गे धावतील. परिणामी हुबळी, धारवाड, दावणगेरे, तुमकूर, बेंगळुरू परिसरातील अनेक महत्त्वाच्या स्थानकांवरील थांबे वगळले जातील, असे कोकण रेल्वेने स्पष्ट केले आहे.
प्रवाशांना रेल्वेचे आवाहन
प्रवाशांनी प्रवासापूर्वी अधिकृत संकेतस्थळ किंवा हेल्पलाइनवर गाडीची अद्यायावत स्थिती तपासूनच नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
दीर्घकालीन देखभाल कामामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगत रेल्वेने होणाऱ्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली. दरम्यान, गोवा पर्यटन हंगामाच्च्या पार्श्वभूमीवर या बदलांचा मोठ्या प्रमाणात परिणाम होणार आहे.
पुणे-एर्नाकुलम गाड्यांचा बदललेला मार्ग
पुणे-एर्नाकुलम साप्ताहिक (११०९७/११०९८) गाड्या ब्लॉकच्या कालावधीत पुणे-पनवेल-रोहा-मडगाव या कोकण रेल्वे मार्गे वळवण्यात येतील. त्यामुळे सातारा, कराड, सांगली, मिरज, बेळगाव, लोंडा, कॅसलरॉक, कुलेम आदी स्थानकांवरील थांबे रद्द राहतील.
या बदलामुळे कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांना पर्यायी सुविधा मिळणार असली तरी पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
Web Summary : Rail track work disrupts Goa train routes from April 28 to June 7. Several express trains are canceled or rerouted, impacting passengers traveling to Goa, Karnataka, and South India. Travelers should check schedules before departure.
Web Summary : 28 अप्रैल से 7 जून तक रेल ट्रैक के काम के कारण गोवा मार्ग की ट्रेनें प्रभावित। कई एक्सप्रेस ट्रेनें रद्द या परिवर्तित मार्ग से चलेंगी, जिससे गोवा, कर्नाटक और दक्षिण भारत जाने वाले यात्रियों को परेशानी होगी। यात्रा से पहले शेड्यूल जांच लें।