जिल्ह्यात होणार ७५७ कोटींची कामे
By Admin | Updated: December 7, 2015 00:56 IST2015-12-07T00:56:19+5:302015-12-07T00:56:19+5:30
भविष्यातील विजेची गरज ओळखून रायगड जिल्ह्यात विविध योजनेंतर्गत ७५७ कोटी ७१ लाख रुपयांची कामे प्रस्तावित केली आहेत.

जिल्ह्यात होणार ७५७ कोटींची कामे
अलिबाग : भविष्यातील विजेची गरज ओळखून रायगड जिल्ह्यात विविध योजनेंतर्गत ७५७ कोटी ७१ लाख रुपयांची कामे प्रस्तावित केली आहेत. येत्या कालावधीत जिल्हा विजेच्याबाबतीत परिपूर्ण करण्यासाठी अपारंपरिक ऊर्जा साधनांवर जास्तीत जास्त भर देऊन ग्रीन एनर्जीचा जिल्हा करण्यात येणार असल्याची माहिती ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.
कंत्राटी कामगारांना परीक्षा पास झाल्यावरच सेवेत सामावून घेणार आहे. कंत्राटी कामगारांनी बरीच वर्षे सेवा केली आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी काही आरक्षण ठेवण्याबाबत गंभीरपणे विचार करण्यात येईल, असेही ऊर्जा मंत्र्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यात मोठ्या संख्येने विकास सुरु झाला आहे. त्याचप्रमाणे तेथे मोठ्या प्रमाणात नागरीकरण आणि शहरीकरणही वाढत आहे. त्यादृष्टीने तेथे विजेच्या पायाभूत सुविधा कमी आहेत. पायाभूत सुविधा उभारण्यासाठी ७५७ कोटी ७१ लाख रुपयांची कामे प्रस्तावित आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने आराखडा सुविधा (१) ३५८.७८ कोटी रुपये, दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजना (१) १३२.१७ कोटी, दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजना (२) ११६.१५ कोटी, एकात्मिक ऊर्जा विकास प्रकल्प (१) ४२.४८ कोटी रुपये, एकात्मिक ऊर्जा विकास प्रकल्प (२)- २५.०५ कोटी रुपये, नैसर्गिक आपत्ती योजना- ८३.०८ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. अलिबागमध्ये प्रस्तावित असणारा टाटा पॉवर प्रोजेक्टबाबत जनतेला विश्वासात घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
रायगड जिल्ह्यामध्ये चार हजार १९४ आणि ७३ औद्योगिक ठिकाणी विजेचे कनेक्शन देण्यास रायगडच्या महावितरण खात्यातील अधिकारी कमी पडले आहेत. ३० डिसेंबरपर्यंत कनेक्शन देण्याबाबत सूचना बावनकुळे यांनी दिल्या
आहेत.
याबाबत दोषी असणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश त्यांनी दिले. मुरुड तालुक्यात १३२ केव्हीचे सब स्टेशन आणि स्विचिंग स्टेशन मार्च २०१६ पर्यंत उभारण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील ३० शेतकऱ्यांना प्रत्येकी ३ लाख रु. सौर वीज पंप मंजूर केले . बेरोजगार अभियंत्यांची नोंदणी जिल्ह्यातच करणार असून त्यांना १५ लाखांची कामे दिली जाणार. तालुकास्तरावर ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीसाठी भवन, शेतकऱ्यांना एलएडी लाइट, नळपाणी पुरवठा योजना सौर उर्जेवर चालविणार असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट
केले.देशाला स्वातंत्र्य प्राप्त होऊन सहा दशके लोटली तरी उरण तालुक्यातील घारापुरी या जागतिक दर्जाच्या बेटावर अद्यापही वीज पोहोचली नाही. मात्र ऊर्जा मंत्रालयाच्या अखत्यारीत तेथे वीज पोहोचविण्याच्या योजनेने मूर्त रूप धारण केले असल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे दिली. सुमारे २५ कोटी रुपयांच्या योजनेसाठी निधी कोठून निर्माण करायचा याची जबाबदारी माझी असून येत्या एक महिन्यात काम संपवून वीज पोहोचणार असल्याचेही ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले.