कामगाराने हडपले ५० लाखाचे मोबाईल गुन्हा दाखल; विक्रीच्या २०६ मोबाईलचा परस्पर अपहार
By सूर्यकांत वाघमारे | Updated: January 4, 2024 19:09 IST2024-01-04T19:09:18+5:302024-01-04T19:09:31+5:30
मोबाईल विक्रेत्यांना मोबाईल पुरवणाऱ्या कंपनीच्या कामगारानेच कंपनीला ५० लाखाचा चुना लावल्याची घटना समोर आली आहे.

कामगाराने हडपले ५० लाखाचे मोबाईल गुन्हा दाखल; विक्रीच्या २०६ मोबाईलचा परस्पर अपहार
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : मोबाईल विक्रेत्यांना मोबाईल पुरवणाऱ्या कंपनीच्या कामगारानेच कंपनीला ५० लाखाचा चुना लावल्याची घटना समोर आली आहे. डिलर्सच्या नावे मोबाईलची बुकिंग घेऊन कामगाराने पाच महिन्यात २०६ मोबाईल हडपले आहेत. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर कंपनीच्या तक्रारीवरून कामगारावर एपीएमसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एपीएमसी परिसरातील आर. एम. इंटरप्रायझेस कंपनीत हा प्रकार घडला आहे. सदर कंपनीमार्फत शहरातील मोबाईल विक्रेत्यांना मागणीनुसार सॅमसंग कंपनीचे नवे मोबाईल पुरवले जातात. हे मोबाईल विक्रेत्यांपर्यंत पोहचवण्यासाठी कामगार ठेवण्यात आले आहेत. त्यापैकी राजकिरण राणे (४५) या कामगाराने पाच महिन्यात २०६ मोबाईलचा अपहार केल्याचा आरोप कंपनीने करत त्याच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यानुसार एपीएमसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
अपहार झालेल्या २०६ मोबाईलची ५० लाख रुपये किंमत आहे. त्यामध्ये नवनवीन स्मार्टफोनचा समावेश आहे. राणे याने मोबाईल विक्रेत्यांना पुरवण्यासाठी कंपनीकडून हे मोबाईल मिळवले. मात्र त्यांना ते न पुरवता परस्पर त्यांची विक्री करून त्याच्या बिलाची रक्कम परस्पर खिशात घातल्याचा कंपनीचा आरोप आहे. बिलाच्या थकबाकीवरून हा प्रकार कंपनीच्या निदर्शनात आला आहे.