महासभेत ४३ नगरसेवकच हजर
By Admin | Updated: March 7, 2016 02:45 IST2016-03-07T02:45:50+5:302016-03-07T02:45:50+5:30
१७ वर्षासाठीच्या २०२४ कोटी १० लाख रुपये किमतीच्या अर्थसंकल्पास शनिवारी रात्री साडेदहा वाजता मंजुरी दिली. मंजुरी देताना १११ लोकनियुक्त व ५ स्वीकृत सदस्यांपैकी फक्त ४३

महासभेत ४३ नगरसेवकच हजर
नामदेव मोरे, नवी मुंबई
महासभेने २०१६ - १७ वर्षासाठीच्या २०२४ कोटी १० लाख रुपये किमतीच्या अर्थसंकल्पास शनिवारी रात्री साडेदहा वाजता मंजुरी दिली. वर्षभराच्या जमा - खर्चाच्या नियोजनाला मंजुरी देताना १११ लोकनियुक्त व ५ स्वीकृत सदस्यांपैकी फक्त ४३ नगरसेवकच उपस्थित होते. तब्बल ७८ नगरसेवकांनी दांडी मारली. लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेविषयी नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
महानगरपालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी १९७५ कोटी ४० लाख रुपये किमतीचा अर्थसंकल्प स्थायी समितीमध्ये सादर केला होता. दोन दिवस चर्चा झाल्यानंतर स्थायी समितीने त्यामध्ये ११ कोटी ५० लाख रुपयांची वाढ सुचविली. सभापती नेत्रा शिर्के यांनी १९८६ कोटी ९ लाख रुपयांचा अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेमध्ये चर्चेसाठी सादर केला. ४ व ५ मार्चला चर्चेसाठी विशेष महासभेचे आयोजन केले होते. अर्थसंकल्पाच्या जमा - खर्चामध्ये सर्व नगरसेवकांनी त्यांच्या सूचना मांडणे अपेक्षित होते. परंतु प्रत्यक्षात दोनही दिवस काही नगरसेवक वगळता इतरांनी राजकीय भाषणबाजी करून एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप करण्यास प्राधान्य दिले.
पहिल्याच दिवशी सभा तब्बल दोन तास उशिरा सुरू झाली. दुपारी जेवणाच्या सुटीनंतरही सभा एक तास उशिरा सुरू झाली. दिवसभरामध्ये ११६ पैकी ११ नगरसेवकांनाच बोलण्याची संधी मिळाली. शनिवारीही सभा एक तास उशिरा सुरू झाली. अर्थसंकल्पावर कोणी किती वेळ बोलायचे याविषयी नियोजन केले नसल्याने सुरुवातीला काही सदस्यांनी १ ते ३ तास भाषणे केली. यामुळे पूर्ण दिवसभरामध्ये ४६ जणांनाच बोलता आहे. दोन दिवसामध्ये ५८ जणांनीच सूचना मांडल्या. वास्तविक सभा अजून एक दिवस चालविणे आवश्यक असताना रात्री आठनंतर घाईगडबडीत भाषणे उरकण्यास सुरवात केली. आयुक्त दिनेश वाघमारे व महापौर सुधाकर सोनावणे यांना त्यांची भूमिका मांडण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. साडेदहा वाजता घाईगडबडीत ३६ कोटी ७५ लाख रुपयांची वाढ करून २०२४ कोटी १० लाख रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला.
अर्थसंकल्पावरील चर्चेमध्ये विरोधी पक्षातील नगरसेवकांनी त्यांची भाषणे झाली की घरी जाण्यास सुरवात केली. शेवटपर्यंत फक्त नामदेव भगत, मनोज हळदणकर, सुनील बाळाराम पाटील व द्वारकानाथ भोईर एवढेच सदस्य उपस्थित होते. सत्ताधारी राष्ट्रवादीचेही अनेक सदस्य अनुपस्थित होते. सायंकाळी पावणेसहा वाजता सभागृहात फक्त २६ सदस्यच उपस्थित असल्याने कोरमअभावी सभा थांबविण्याची वेळ आली.
नगरसेवकांच्या उदासीनतवर प्रेक्षागॅलरीमधील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. दिवसभर नगरसेवकांच्या भाषणांवर नियंत्रण ठेवले नाही व सायंकाळी नामदेव भगत, शिवसेना गटनेते द्वारकानाथ भोईर, रवींद्र इथापे, राष्ट्रवादीचे पक्षप्रतोद डॉ. जयाजी नाथ यांना ५ ते १० मिनिटांमध्ये भाषण उरकण्यास सांगण्यात
आले.