पाच दिवसांत ४०० चालकांना दंड

By Admin | Updated: August 20, 2016 04:55 IST2016-08-20T04:55:12+5:302016-08-20T04:55:12+5:30

तुम्ही दुचाकीवर कामानिमित्त बाहेर पडत आहात, सावधान! हेल्मेट, खिशात वाहनपरवाना, दुचाकीचे आरसी बुक आणि विमा अशी कागदपत्रे जवळ ठेवा. कळंबोली वाहतूक पोलीस

400 drivers penalty in five days | पाच दिवसांत ४०० चालकांना दंड

पाच दिवसांत ४०० चालकांना दंड

कळंबोली : तुम्ही दुचाकीवर कामानिमित्त बाहेर पडत आहात, सावधान! हेल्मेट, खिशात वाहनपरवाना, दुचाकीचे आरसी बुक आणि विमा अशी कागदपत्रे जवळ ठेवा. कळंबोली वाहतूक पोलीस तपासणीत सापडलात आणि हेल्मेट व इतर कागदपत्रे नसली तर किमान साडेतीन हजार दंड भरण्याची तयारी ठेवा. नव्या नियमानुसार दंड आकारण्याची मोहीम कळंबोली वाहतूक पोलिसांनी हाती घेतली आहे. पाच दिवसात जवळपास चारशेपेक्षा जास्त वाहनांवर कारवाई करून त्यांच्याकडून एक लाखाहून अधिक दंड जमा करण्यात आला आहे.
केंद्र शासनाने अपघात रोखण्यासाठी वाहनांचे नियम कडक केले आहेत. प्रत्येक कलमाखालील दंडात दहा पटीने वाढ केली आहे. नियमांची अंमलबजावणी ४ आॅगस्टपासून राज्यभरात सुरू झाली आहे. त्यात मोबाइलवर बोलणे व हेल्मेट सक्तीचा प्रामुख्याने समावेश आहे. वाहतूक विभागाचे पोलीस उपआयुक्त अरविंद साळवे यांनी वाहन तपासणीची कडकपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश वाहतूक पोलिसांना दिले आहेत. त्यानुसार कळंबोली वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी गोरख पाटील यांनी ४४ दुचाकींवर कारवाई केली. वाहतूक पोलिसांनी मोबाइलवर बोलणारे, ट्रिपलसीट आणि राँग साईडने वाहने चालविणाऱ्यांना लक्ष्य केले. दंड भरून वाहतूक पोलिसांकडून वाहने सोडवून नेली. वाहतूक पोलिसांनी कळंबोली सर्कल, पुरुषार्थ पेट्रोलपंप, बिमा संकुल, खांदा वसाहत सिग्नल, रोडपाली या ठिकाणी वाहनांची तपासणी मोहीम घेतली. नियम मोडणाऱ्या कोणालाही सुटका न देता गोरख पाटील यांनी कारवाई केली. त्याचबरोबर राजकीय दबाव, तसेच याची त्याची ओळख सांगून सुटका करणाऱ्यांवर तर वाहतूक पोलिसांनी सर्वात अगोदर कारवाईचा बडगा उगारला. (वार्ताहर)

अनेकदा वाहनचालक वाहतुकीचे नियम सर्रास पायदळी तुडवतात. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होत असली तरी रक्कम कमी असल्याने फारसा परिणाम होत नव्हता. आता नवीन नियमानुसार दंडात्मक रक्कम मोठी आहे. त्यामुळे पुढच्या वेळी नक्कीच वाहनचालक नियमाचे पालन करेल, असा विश्वास वाटतो. कळंबोली वाहतूक शाखेकडून नवीन नियमानुसार दंडात्मक कारवाईस सुरूवात करण्यात आली आहे.
- गोरख पाटील,
पोलीस निरीक्षक,
कळंबोली वाहतूक शाखा

Web Title: 400 drivers penalty in five days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.