२७ गावांची नगरपालिका होणारच - मुख्यमंत्री
By Admin | Updated: September 22, 2015 03:39 IST2015-09-22T03:39:24+5:302015-09-22T03:39:24+5:30
त्या २७ गावांतील त्या ४९९ कर्मचाऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही. सर्वांची नोकरी शाबूत राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना दिली.

२७ गावांची नगरपालिका होणारच - मुख्यमंत्री
चिकणघर : त्या २७ गावांतील त्या ४९९ कर्मचाऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही. सर्वांची नोकरी शाबूत राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना दिली. सर्वपक्षीय संरक्षण समिती आणि या कर्मचाऱ्यांनी सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्या वेळी फडणवीसांनी कर्मचाऱ्यांना नोकरीबाबत आश्वस्त केले. आपल्या भाषणात त्यांनी गावांचा घाईघाईने मनपात समावेश केल्याचे मान्य करून जेव्हा खरी हकीगत लक्षात आली, तेव्हा या गावांवर अन्याय झाल्याचे लक्षात आल्याने ती वगळल्याबाबत हालचाली केल्या. मात्र, यावर निवडणूक आयोगाने हरकत घेतली असली तरी शासनाचा निर्णय योग्य असून न्यायालयात आमची बाजूू २२ तारखेला मांडली जाईल. २७ गावांसाठी स्वतंत्र नगरपालिका ही काळ्या दगडावरची रेघ असल्याचा पुनरुच्चार या वेळी मुख्यमंत्र्यांनी केला.
कर्मचाऱ्यांचा पगार देण्याची जबाबदारी केडीएमसीची आहे. याबाबत, आयुक्त ई. रवींद्रन यांच्याशी बोलणार असल्याचे ते म्हणाले. १०८९ कोटींचा निधी हा २७ गावांसाठी असल्याचे सांगून त्यांची नगरपालिका होणारच, असा विश्वास बाळगावा, अशी हमी मुख्यमंत्र्यांनी दिली.