एफडीएची २६ दुकानांवर धाड
By Admin | Updated: October 26, 2015 01:02 IST2015-10-26T01:02:04+5:302015-10-26T01:02:04+5:30
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर उत्साहावर विरजण पडू नये यासाठी एफडीएचे भरारी पथक सज्ज झाले असून भेसळयुक्त माव्यापासून बनविणाऱ्यांना या पथकाने चांगलाच दणका दिला आहे

एफडीएची २६ दुकानांवर धाड
पेण : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर उत्साहावर विरजण पडू नये यासाठी एफडीएचे भरारी पथक सज्ज झाले असून भेसळयुक्त माव्यापासून बनविणाऱ्यांना या पथकाने चांगलाच दणका दिला आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार व वरिष्ठ कार्यालयाकडून पारित झालेल्या परिपत्रकानुसार रायगड युनिटच्या पेण येथील एफडीएच्या सहाय्यक आयुक्त व अन्न सुरक्षा अधिकारी वर्गाने रायगड जिल्ह्यातील २६ दुकानांवर छापे मारून ६९ अन्न नमुने तपासणीसाठी जप्त केल्याने मिठाई दुकानदार व अन्न पदार्थ विक्री व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
१ सप्टेंबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत एफडीएची धडक मोहीम असून यासाठी भरारी पथके मिठाई विक्रेत्यांवर वॉच ठेवून आहेत. सर्वात मोठा सण असलेल्या दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी माव्यापासून बनविलेली मिठाई मोठ्या प्रमाणावर भेट दिली जाते. यासाठी गल्लीबोळात हलवाई, मिठाई व जंकफूडची दुकाने थाटली जाऊ लागली आहेत. या दुकानातील अन्न पदार्थाची गुणवत्ता व भेसळीचे प्रमाण याबाबत सामान्य जनतेला काहीच माहिती नसते. अशावेळी सणांच्या काळात चढ्यादराने मिठाई व अन्नपदार्थांची विक्री करुन उखळ पांढरे करणाऱ्या विक्रेत्यांना एफडीएच्या पथकाचा चांगला दणका मिळणार आहे.
दिवाळी सणात परराज्यातून येणारे पॅकिंग फूड, खवा, मावा, शीतपेय व इतर अन्न पदार्थांमध्ये भेसळीचे प्रमाण असते. शुध्दतेची गॅरंटी देणारे तेल, वनस्पती तूप, दूधजन्य पदार्थ, मसाले व इतर अन्नपदार्थ चांगले आकर्षक वेस्टन लावून विक्रीचा खप वाढविण्यावर भर असतो. या साऱ्यांनाच वेसण म्हणून अन्न सुरक्षा मानके कायद्याअंतर्गत अन्न नमुन्याची तपासणी करण्यासाठी एफडीएची धडक मोहीम आहे.
पेण रायगड युनिटचे अन्न सुरक्षा अधिकारी यांनी जिल्ह्यात यासाठी धडक मोहीम हाती घेतली असून या पथकात सहाय्यक अन्न आयुक्त
भ. ऊ. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न निरीक्षक आर. एस. बोडके, ग. वि. जगताप, आर. पी. कुलकर्णी, बी. ए. बाळाजी,
प्र. शि. पवार व सु. ना. जगताप यांनी २६ दुकानांवर धाडी टाकून ६९ अन्न नमुने ताब्यात घेऊन तपासणीसाठी पाठविले आहेत. यापैकी काही नमुने तपासणी होवून आले आहेत. यातील माव्याचे नमुने अप्रमाणीत आल्याने अधिकारी सतर्क झालेत.
तपासणीसाठी घेतलेल्या अन्न नमुन्यात तेलाचे २२, मिठाईचे २५, वनस्पती तूप १०, इतर अन्नपदार्थ ६, मसाले ४ व नमकीन पदार्थ २, दूधजन्य १ असा समावेश आहे.
अन्न सुरक्षा मानके कायद्यानुसार, अन्न शिजविण्यासाठी आणि विकण्यासाठी एफडीएची नोंदणी परवाना असणे बंधनकारक आहे. मिठाई विक्रेत्याकडे परवाना आहे का? याचीही एफडीएचे पथक चौकशी तथा तपासणी करीत आहेत. नोंदणी परवाना नसलेल्या विक्रेत्यांना कडक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
मिठाई बनविणारे विक्रेते - कारागीर यांची शारीरिक तपासणी, फिटनेस सर्टिफिकेट, मिठाई बनविण्याची साधने, जागा, स्वच्छ आहे का? यामध्ये अन्न सुरक्षा मानके कायद्याचा भंग होता कामा नये. भंग झाल्यास कारवाई अटळ आहे. अशा सूचनाही एफडीएच्या पथकाकडून संबंधितांना देण्यात येत आहेत. मिठाई, ड्रायफूड व इतर अन्नपदार्थ खरेदी करताना ग्राहकांनी योग्य ती काळजी घ्यावी आणि दिवाळी सणाचा आनंद उपभोगावा असे आवाहन अन्न सुरक्षा सहाय्यक आयुक्त भ. ऊ. पाटील यांनी केले आहे. (वार्ताहर)