व्यापाऱ्यांमुळे २५० कोटी बुडणार?

By Admin | Updated: March 10, 2016 02:09 IST2016-03-10T02:09:24+5:302016-03-10T02:09:24+5:30

आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना हाती असल्याने पालिकेच्या एलबीटी विभागाने करवसुलीसाठी धडक मोहीम हाती घेतली आहे

250 crore due to merchants? | व्यापाऱ्यांमुळे २५० कोटी बुडणार?

व्यापाऱ्यांमुळे २५० कोटी बुडणार?

उल्हासनगर : आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना हाती असल्याने पालिकेच्या एलबीटी विभागाने करवसुलीसाठी धडक मोहीम हाती घेतली आहे. पण त्याविरोधात व्यापारी आक्रमक झाले असून त्यांच्या इच्छेविरोधात करवसुली केल्यास आंदोलनाचा इशारा राष्ट्रवादीचे युवा नेते ओमी कालानी यांनी दिला आहे. पालिकेचा एलबीटी विभाग करवसुलीसाठी जिद्दीला पेटल्याने या मुद्द्यावरून शहरात भडका उडण्याची चिन्हे आहेत. जवळपास ९५ टक्के व्यापाऱ्यांनी कर भरलेला नाही. तो वसूल न केल्यास पालिकेला सुमारे २५० कोटींवर पाणी सोडावे लागण्याची चिन्हे आहेत.
मानधनावर घेतलेल्या पाच सल्लागारांनी गेल्या आठ महिन्यात १५,६०० पैकी ५४३ व्यापाऱ्यांकडून करवसुली केली आहे. त्यातून पालिकेला २ कोटी ८९ लाख रूपयाचे उत्पन्न मिळाले. एलबीटी बंद झाल्यानंतरच्या पाच वर्षात एलबीटी वसूल होऊ शकते आणि ती भरणे बंधनकारक असल्याने व्यापाऱ्यांत खळबळ उडाली आहे. एलबीटी विभागाचे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी सल्लागारांची संख्या वाढविण्याची विनंती पालिका आयुक्तांकडे केली आहे. ही संख्या वाढल्यास १५ हजार व्यापाऱ्यांच्या कराची वसुली सहा महिन्यांत होईल. मात्र पालिका निवडणुका डोळयासमोर ठेवून काही राजकीय नेते व्यापाऱ्यांच्या पाठीशी उभी ठाकले आहेत. व्यापारी संघटनेचे नेते बच्चो रूपचंदानी, नरेश दुर्गानी यांच्यासह इतरांनी नियमानुसार कर भरणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. मात्र काही नेते व्यापाऱ्यांची दिशाभूल करीत असल्याची माहिती लेंगरेकर यांनी दिली आहे.

Web Title: 250 crore due to merchants?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.