२५ टक्के पाणीसाठा स्थानिकांसाठी
By Admin | Updated: September 25, 2015 02:26 IST2015-09-25T02:26:37+5:302015-09-25T02:26:37+5:30
सिंचन घोटाळ्यामध्ये चर्चेत आलेले कोंढाणे धरण विकत घेण्यासाठी सिडको उत्सुक आहे. याच परिसरात असलेले मोरबे धरण यापूर्वीच नवी मुंबई मनपाने विकत घेतले आहे

२५ टक्के पाणीसाठा स्थानिकांसाठी
कर्जत : सिंचन घोटाळ्यामध्ये चर्चेत आलेले कोंढाणे धरण विकत घेण्यासाठी सिडको उत्सुक आहे. याच परिसरात असलेले मोरबे धरण यापूर्वीच नवी मुंबई मनपाने विकत घेतले आहे. धरणासाठी जमीन देणाऱ्या शेतकरी आणि स्थानिक रहिवाशांना थेंबभर पाणी महानगर पालिका मोरबे धरणातून देण्यास तयार नाही, अशा स्थितीत कोंढाणे धरणाचे असे होऊ नये म्हणून २५ टक्के पाणीसाठा राखीव ठेवण्याच्या मागणीचा ठराव कर्जत तालुक्याच्या आमसभेत घेण्यात आला आहे.
कोंढाणे धरणामध्ये १०५ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा होऊ शकतो. कर्जत तालुक्यात कातळदरा भागात लोणावळा - खंडाळा भागातून वाहून येणारे पाणी कोंढाणे येथे मातीचा बांध घालून अडविले जाणार आहे. या धरणाचे काम २०११ मध्ये प्रथम लघुपाटबंधारे प्रकल्प म्हणून सुरु झाले होते, मात्र काही महिन्यात या धरणाचे रूपांतर मध्यम प्रकल्पात झाल्याने पुढे राज्यात बाहेर आलेल्या सिंचन घोटाळ्यात हा प्रकल्प देखील निविदेतील तफावतीत अडकला आणि धरणाचे काम बंद पडले. प्रकल्पासाठी धरण परिसरातील दोन गावांचे विस्थापन होणार असून धरणासाठी हजारो एकर जमीन पाण्याखाली जाणार आहे. २५० हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे.