गणेशभक्तांसाठी २,२११ विशेष बस
By Admin | Updated: August 17, 2016 03:10 IST2016-08-17T03:10:46+5:302016-08-17T03:10:46+5:30
संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या विघ्नहर्ता गणरायांचे आगमन अवघ्या २० दिवसांवर येऊन ठेपले आहे.

गणेशभक्तांसाठी २,२११ विशेष बस
जयंत धुळप, अलिबाग
संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या विघ्नहर्ता गणरायांचे आगमन अवघ्या २० दिवसांवर येऊन ठेपले आहे. यंदाही चाकरमान्यांना गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या गंभीर व धोकादायक दुरवस्थेचे विघ्न पार करूनच कोकणातील आपल्या घरी पोहोचावे लागणार आहे. गणेशभक्तांसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाची राज्य परिवहन मंडळाने तब्बल २ हजार २११ जादा एसटी बसेसची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती रायगड (रामवाडी) एसटी विभागीय कार्यालयातील वाहतूक निरीक्षक संजय हर्डीकर यांनी दिली.
येत्या १ ते ५ सप्टेंबरदरम्यान मुंबई सेंट्रल, बोरीवली, परळ, ठाणे आदी ठिकाणांहून सुटणाऱ्या या २ हजार २११ विशेष एसटी बसेसचे आगाऊ आरक्षण सुरू झाले आहे. यापैकी ६० टक्केहून अधिक बसेसचे आरक्षण पूर्ण झाले आहे. दरम्यान, गणेशोत्सवांती परतीच्या प्रवासाकरिता रायगड (रामवाडी) एसटी विभागातून ११ व १२ सप्टेंबर रोजी १९८ एसटींची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचेही हर्डीकर यांनी सांगितले.
मुरूड एसटी आगारातून यंदा १३६ परतीच्या प्रवासाच्या बस फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. या बसचे आगाऊ आरक्षण महिनाभर आधीच उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती मुरूड आगाराचे प्रमुख तेजस गायकवाड यांनी दिली.