प्लास्टीकचा २२०० किलोचा साठा जप्त
By Admin | Updated: July 7, 2017 06:39 IST2017-07-07T06:39:22+5:302017-07-07T06:39:22+5:30
शहरात ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टीक पिशव्यांचा वापर करणाऱ्यांवर महापालिकेने कारवाई सुरू केली आहे. एपीएमसी व बेलापूर

प्लास्टीकचा २२०० किलोचा साठा जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : शहरात ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टीक पिशव्यांचा वापर करणाऱ्यांवर महापालिकेने कारवाई सुरू केली आहे. एपीएमसी व बेलापूर परिसरामध्ये धाड टाकून २२०० किलो वजनाच्या प्लास्टीक पिशव्या जप्त केल्या आहेत.
नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी पदभार स्वीकारल्यापासून प्लास्टीकमुक्त शहर बनविण्यासाठी सकारात्मक प्रयत्न सुरू केले आहेत. स्वत: प्लास्टीक पिशव्यांचा वापर बंद केला असून शहरवासीयांनाही प्लास्टीक न वापरण्याचे आवाहन केले आहे. दुकानदारांनी ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांची विक्री करू नये असे स्पष्ट बजावले असतानाही अनेक दुकानदार नियम धाब्यावर बसवून प्लास्टीक पिशव्यांची विक्री करत आहेत. अशा दुकानदारांवर कारवाई सुरू केली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरातील कृषी प्लाझा इमारतीमधील दुकानांमध्ये धाड टाकली. तेथे १०१ गोणींमध्ये तब्बल २२०० किलो प्लास्टीक पिशव्यांचा साठा सापडला आहे. या पिशव्यांची वाहतूक करण्यासाठी एमएच ०४ जीएफ ८४२२ क्रमांकाचा टेंपोचा वापर केल्याचे स्पष्ट झाले असून तो टेंपोही जप्त करण्यात आला आहे. आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण, उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार विभाग अधिकारी अंगाई साळुंखे यांच्या नियंत्रणाखाली पालिकेच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
बेलापूर विभागामध्ये सेक्टर ११ येथील साईनाथ वाईन्स व परशुराम गावडे शॉप सेक्टर ५० नेरूळ येथील मोहन चौधरी शॉप, ओमकार मेडिकल अँड जनरल स्टोअर्स, भैरवनाथ डेरी, सेक्टर १५ सीबीडी बेलापूर येथील शिवआरती डेअरी या सहा दुकानांमधून ७ किलो ३०० ग्रॅम इतका ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांचा साठा जप्त करून प्रत्येकी ५ हजारप्रमाणे ३० हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूल केली आहे. अशाप्रकारची प्लास्टीकविरोधी मोहीम संपूर्ण महापालिका कार्यक्षेत्रामध्ये राबविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.