डेंग्यूने घेतले २२ बळी

By Admin | Updated: September 14, 2015 23:52 IST2015-09-14T23:52:23+5:302015-09-14T23:52:23+5:30

महापालिकेच्या आरोग्य विभागाला भ्रष्टाचाराची कीड लागली आहे. आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. साथीच्या रोगांनी थैमान घातले आहे. डेंग्यूमुळे आतापर्यंत

22 victims of dengue | डेंग्यूने घेतले २२ बळी

डेंग्यूने घेतले २२ बळी

नवी मुंबई : महापालिकेच्या आरोग्य विभागाला भ्रष्टाचाराची कीड लागली आहे. आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. साथीच्या रोगांनी थैमान घातले आहे. डेंग्यूमुळे आतापर्यंत २२ जणांचा बळी गेला असून याला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नगरसेवकांनी केली आहे.
डेंग्यू, मलेरिया व शहरातील आरोग्याविषयी चर्चा करण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन केले होते. या सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी आरोग्य विभागावर जोरदार टीका केली. राष्ट्रवादीचे नगरसेवक रवींद्र इथापे यांनी प्रशासन डेंग्यू, मलेरियाची खोटी आकडेवारी देत असल्याचा आरोप केला. शहरात हजारो नागरिकांना डेंग्यू झाला आहे. नगरसेविका दिव्या गायकवाड यांनी, आरोग्य विभागात भ्रष्टाचार सुुरु आहे. हिरानंदानीबरोबर चुकीचा करार केला, अधिकारी महापालिकेचे वाटोळे करत आहेत, अशा दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. महापालिकेच्या आरोग्य विभागाने खाजगी रुग्णालये चालविण्याची सुपारी घेतली असण्याचा आरोप नवीन गवते यांनी केला.
टक्केवारीचे राजकारण थांबविले तरच कारभार सुधारेल असे मत किशोर पाटकर यांनी व्यक्त केले. महापालिका योग्य जनजागृती करण्यात अपयशी ठरली आहे. सोशल मीडियाचाही जनजागृतीसाठी वापर करावा असे मत ऋचा पाटील यांनी व्यक्त केले. आरोग्य विभागात सक्षम अधिकारी नसल्याचे मत गिरीष म्हात्रे यांनी व्यक्त केले. आरोग्य विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचेच आरोग्य धोक्यात आले असल्याची माहिती संजू वाडे यांनी दिली. एम.के. मढवी यांनी आरोग्य विभागामध्ये अनागोंदी कारभाराला डॉ. संजय पत्तीवार जबाबदार असल्याचा आरोप केला. साफसफाई ठेका, रखडलेली रुग्णालये व इतर अनागोंदी कारभारावर जोरदार टीका केली. आरोग्य विभागाचे वाटोळे करणाऱ्यांना नोकरीतून काढून टाका, अशी मागणी त्यांनी केली.
भाजपाचे रामचंद्र घरत यांनी ही आरोग्य विभागातील अनागोंदी निदर्शनास आणून दिली. महाालिका रुग्णालयात जागा उपलब्ध नाही, रुग्णांना परत पाठविले जात असल्याची खंत सायली शिंदे यांनी व्यक्त केली.
फोर्टीज हिरानंदानी रुग्णालयाचा फायदा सामान्य नागरिकांना होत नसल्याबद्दल सर्वांनी खंत व्यक्त केली. (प्रतिनिधी)

सभापतींनी केले आवाहन
आरोग्य समिती सभापती पूनम पाटील यांनी आरोग्याविषयी वस्तुस्थिती सादर केली. आरोग्य विभाग सक्षम करण्यासाठी तीनही नवीन रुग्णालये सुरु झाली पाहिजेत. वाशी रुग्णालयातील एनआयसीयू वाढविले पाहिजेत.
डेंग्यू व मलेरियाविरोधात लढा देण्यासाठी नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

जेवणात आढळल्या अळ्या
आरोग्यविषयी आयोजित महासभेत नगरसेवकांसाठी जेवणाची व्यवस्था केली होती. बंदोबस्तावर असलेले हवालदार संतोष राठोड यांना जेवणामध्ये किडे सापडले. याविषयी तत्काळ महापौरांकडे तक्रार करण्यात आली.

नरेंद्र पाटील यांनी दिले निवेदन
माथाडी रुग्णालयामध्येही डेंग्यू व मलेरियाचे रुग्ण वाढले आहेत. माथाडी वसाहतीमधील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. माथाडी नेते आमदार नरेंद्र पाटील, नगरसेविका भारती पाटील, शंकर मोरे यांनी महापौर सुधाकर सोनावणे व आयुक्त दिनेश वाघमारे यांना निवेदन दिले.

मृत व्यक्तीच्या घेतल्या सह्या
धुरीकरण व औषध फवारणीचे काम व्यवस्थित होत नसल्याचे भारती कोळी यांनी निदर्शनास आणून दिले. चार वर्षांपूर्वी मृत झालेल्या व्यक्तीच्या सह्या धुरीकरणाच्या वहीवर घेतल्या आहेत. किती खोटा कारभार सुरु आहे हे निदर्शनास आणून दिले.

डास मारण्याच्या औषधामध्ये भेसळ
शहरात धुरीकरण व औषधांमध्ये भेसळ केली जात असल्याचे काँग्रेस नगरसेविका मंदाकिनी म्हात्रे यांनी निदर्शनास आणून दिले. औषधांचे नमुने महापौरांना सादर केले. औषधांमध्ये भेसळ असल्यामुळे डास मरत नाहीत, भेसळ करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

नगरसेवकांनी मानले ‘लोकमत’चे आभार
शहरातील कोलमडलेल्या आरोग्य व्यवस्थेविषयी ‘लोकमत’ने एक महिन्यापासून सातत्याने आवाज उठविला आहे. ‘लोकमत’च्या वृत्ताचे महासभेतही पडसाद उमटले. रवींद्र इथापे यांनी ‘लोकमत’चे आभार मानले. एम.के. मढवी यांनी ‘लोकमत’च्या बातम्यांचा संदर्भ देवून शहरात किती बिकट स्थिती झाली आहे याकडे लक्ष वेधले. अनेक नगरसेवकांनी ‘लोकमत’ची कात्रणे दाखवून प्रशासनाचे लक्ष आरोग्य विभागाकडे वेधले.

Web Title: 22 victims of dengue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.