तळोजा कारागृह कर्मचाऱ्यांसाठी १८२ नवी घरे; पालघरमध्येही दीड हजार कैदी क्षमतेचे नवे कारागृह

By नारायण जाधव | Published: December 6, 2023 08:11 PM2023-12-06T20:11:10+5:302023-12-06T20:11:26+5:30

४१८ कोटी ८२ लाख रुपये खर्च करण्यात येणार असून खर्चास मान्यता

182 new houses for Taloja jail staff; A new jail with a capacity of one and a half thousand inmates is also in Palghar | तळोजा कारागृह कर्मचाऱ्यांसाठी १८२ नवी घरे; पालघरमध्येही दीड हजार कैदी क्षमतेचे नवे कारागृह

तळोजा कारागृह कर्मचाऱ्यांसाठी १८२ नवी घरे; पालघरमध्येही दीड हजार कैदी क्षमतेचे नवे कारागृह

नारायण जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: येथील तळोजा कारागृह कर्मचाऱ्यांच्या धोकादायक झालेल्या घरांवर गृहविभागाने तोडगा काढला आहे. या ठिकाणी नवी १८२ घरे बांधण्यात येणार असून त्यासाठी ७० कोटी २० लाख रुपयांच्या प्रशासकीय खर्चास मंगळवारी मान्यता देण्यात आली. याशिवाय पालघर येथे दीड हजार कैदी क्षमतेच्या नव्या कारागृहासह ३७५ कर्मचारी निवासस्थाने बांधण्यात येणार आहेत. त्यावर ४१८ कोटी ८२ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. या खर्चासही मान्यता देण्यात आली आहे.

मुंबईच्या आर्थर रोड, कल्याणचे आधारवाडी आणि ठाणे कारागृहावरील कैद्यांचा भार कमी करण्यासाठी शासनाने नवी मुंबईतील कळंबोली येथे नवे कारागृह बांधले असून ते २००८ पासून कार्यान्वित केले आहे. मात्र, देखभाल दुरुस्ती अभावी गेल्या १५ वर्षांत या कारागृहासह तेथील कर्मचारी निवासस्थानांची अतिशय दयनिय अवस्था झाली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने तळोजा तुरुंग परिसरात पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी तीन-चार मजली १६ इमारती बांधल्या आहेत. यातील दोन इमारती जेलर व त्यांच्या कुटुंबीयांसाठी तर उर्वरित १४ ते १५ इमारती पोलिस शिपाई व सुभेदारांसाठी आहेत. तेथे शेकडो पोलिस कुटुंबे राहतात. त्यांना या धोकादायक इमारतींमुळे धोका निर्माण झाला आहे.
देखभाल दुरुस्ती अभावी इमारतींचे छत गळत असून, भिंतीतून पाणी पाझरत आहे. त्यामुळे प्लास्टर कोसळण्यासारखे प्रकार घडत आहेत. यामुळे येथील इमारतींमध्ये कोंदट व घाणीचे साम्राज्य पसरले आहे. स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे कुटुंबीयांसह जीव मुठीत घेऊन कर्मचाऱ्यांना राहवे लागत आहे.

७० कोटी २० लाखांचा खर्च

यामुळे यावर तोडगा म्हणून आता तळोजा येथे सरासरी २८ चौरस मीटर क्षेत्राच्या १८२ नव्या सदनिका बांधण्यात येणार आहेत. १४९२० चौरस मीटर क्षेत्राच्या भूखंडावर ४१ कोटी ७७ लाख ६० हजार रुपये खर्चून त्यांचे बांधकाम करण्यात येणार आहे. तर पाणीपुरवठा, अग्निशमन सुविधा आणि इतर बाबींवर ४९ कोटी ४२ लाखावर रक्कम खर्च करण्यात येणार आहे. हा सर्व खर्च ७० कोटी २० लाखावर आहे.

पालघर कारागृहावर ४१९ कोटींचा खर्च

सध्या महामुंबई क्षेत्रात मुंबईचे ऑर्थर रोड, ठाणे, कल्याणचे आधारवाडी आणि तळोजाही कारागृहे आहेत. मात्र, कैद्यांच्या वाढत्या संख्येमुळे ती तुडुंब भरली आहे. यामुळे नव्याने उदयास आलेल्या पालघर जिल्ह्यासाठी हक्काचे नवे कारागृह बांधण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे. दीड हजार कैदी क्षमतेच्या नव्या कारागृहासह ३७५ कर्मचारी निवासस्थाने पालघरच्या उमरोळी येथे बांधण्यात येणार आहेत. नव्याने उदयास आलेल्या मीरा-भाईंदर-वसई विरार पोलिस आयुक्तालय क्षेत्रातील कैदी ठेवण्यास त्याची मदत होणार आहे.

अहमदनगरच्या पारनेरमध्ये नवीन जेल

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरच्या नारायणडोह येथेही ५०० कैदी क्षमतेच्या कारागृहासह १२० कर्मचारी निवासस्थाने बांधण्यात मान्यता मिळाली असून त्यावर १७५ कोटी ९० लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

Web Title: 182 new houses for Taloja jail staff; A new jail with a capacity of one and a half thousand inmates is also in Palghar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.