महापालिकेच्या १६२ शिक्षकांच्या बदल्या

By Admin | Updated: July 5, 2016 02:51 IST2016-07-05T02:51:37+5:302016-07-05T02:51:37+5:30

महापालिकेच्या अधिकाऱ्यांपाठोपाठ सोमवारी शिक्षकांना बदलीच्या प्रक्रियेला सामोरे जावे लागले. अनेक वर्षे एकाच शाळेत कार्यरत असलेल्या १६२ शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

162 teacher transfers of municipal corporation | महापालिकेच्या १६२ शिक्षकांच्या बदल्या

महापालिकेच्या १६२ शिक्षकांच्या बदल्या

नवी मुंबई : महापालिकेच्या अधिकाऱ्यांपाठोपाठ सोमवारी शिक्षकांना बदलीच्या प्रक्रियेला सामोरे जावे लागले. अनेक वर्षे एकाच शाळेत कार्यरत असलेल्या १६२ शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये मुख्याध्यापकांसह पदवीधर शिक्षक व सहशिक्षकांचा समावेश आहे.
महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दर्जात सुधार घडवण्याच्या दृष्टीने आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार शिक्षण विभागामार्फत १६२ शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. सद्यस्थितीला महापालिकेच्या ६८ प्राथमिक शाळांकरिता विविध संवर्गातील ७१५ शिक्षक पदांना मंजुरी आहे. प्रत्यक्षात मात्र ५४० कार्यरत आहेत. त्यापैकी बरेच शिक्षक अनेक वर्षांपासून एकाच शाळेत कार्यरत होते. त्यांची इतर शाळांमध्ये बदली करण्यात आली आहे. बदली झालेल्या शिक्षकांमध्ये १३ मुख्याध्यापक, ५ पदवीधर शिक्षक तर १४४ सहशिक्षकांचा समावेश आहे. किमान ७ वर्षे ४ महिने १५ दिवस ते कमाल १२ वर्षे एकाच शाळेत ते कार्यरत होते. अपंग संवर्गातील शिक्षक तसेच निवासाची गैरसोय होईल अशांना मात्र बदली प्रक्रियेतून वगळण्यात आलेले आहे, तर खैरणेतील एकमेव उर्दू माध्यमाच्या शाळेतील शिक्षकांनाही त्याच ठिकाणी ठेवण्यात आले आहे. शिवाय ज्या इमारतीमध्ये दोन शाळा असतील, त्याठिकाणच्या शिक्षकांची बदली करताना, त्याच इमारतीमधील शाळेत होणार नाही याचीही खबरदारी घेण्यात आलेली आहे. अनेक वर्षांनंतर झालेल्या शिक्षकांच्या बदल्यांमुळे शालेय व्यवस्थापनाला गती मिळून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दर्जातही वाढ होईल, असा विश्वास आयुक्त तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 162 teacher transfers of municipal corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.