जिल्ह्यातील १६ लाख मजुरांना वर्षभर रोजगार
By Admin | Updated: October 5, 2015 00:15 IST2015-10-05T00:15:05+5:302015-10-05T00:15:05+5:30
पावसाअभावी जिल्ह्यात काही प्रमाणात दुष्काळस्थिती निर्माण झाली आहे. शेतांमध्ये काम नसल्यामुळे जिल्ह्यातील पाच तालुक्यांमधील गावपाड्यांत राहणाऱ्या मजुरांच्या हाताला वर्षभर

जिल्ह्यातील १६ लाख मजुरांना वर्षभर रोजगार
सुरेश लोखंडे,ठाणे
पावसाअभावी जिल्ह्यात काही प्रमाणात दुष्काळस्थिती निर्माण झाली आहे. शेतांमध्ये काम नसल्यामुळे जिल्ह्यातील पाच तालुक्यांमधील गावपाड्यांत राहणाऱ्या मजुरांच्या हाताला वर्षभर काम देण्यासाठी ग्रामपंचायती, शासकीय यंत्रणांनी नरेगाच्या माध्यमातून सुमारे पाच हजार ८९० शेल्फची कामे उपलब्ध केली आहेत. त्याद्वारे १६ लाख सात हजार ७५५ मजुरांच्या हातांना काम मिळणार आहे.
दुष्काळात मजुरांच्या हातांना नरेगाद्वारे कामे उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींसह शासकीय यंत्रणांनी गावपाड्यांमध्ये विविध स्वरूपांची कामे हाती घेतली आहेत. यामध्ये ग्रामपंचायतींनी तीन हजार ९९७ कामे काढून त्याद्वारे आठ लाख नऊ हजार ५०६ मजुरांना काम दिले जाणार आहे. याप्रमाणेच इतर यंत्रणांनी एक हजार ८९३ कामे उपलब्ध करून त्याद्वारे सात लाख ९८ हजार २४९ मजुरांना रोजगार देण्यात येणार आहे.
आदिवासी, दुर्गम भागातील मजुरांची उपासमार होऊ नये, यासाठी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेद्वारे विविध कामे काढणे बंधनकारक करण्यात आले आहे. यानुसार, अकुशल कामगारांसाठी पाच हजार ८९० कामे शेल्फवर काढली आहेत. त्यावर कमीतकमी १६ लाख सात हजार ७५५ मजुरांना कामे करता येणार आहेत. यासाठी १८१ रुपये मजुरी निश्चित केली आहे. या आधी एप्रिल महिन्यापर्यंत या नरेगाच्या मजुरांना केवळ १६५ रुपये मजुरी मिळत असे. त्यात आता वाढ झाली आहे.