१३० कोटींचे कर्ज वाटप

By Admin | Updated: September 24, 2015 00:21 IST2015-09-24T00:21:56+5:302015-09-24T00:21:56+5:30

यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बँकांच्या माध्यमातून पीक कर्जाचे वाटप

130 crore loan allocation | १३० कोटींचे कर्ज वाटप

१३० कोटींचे कर्ज वाटप

अलिबाग : यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बँकांच्या माध्यमातून पीक कर्जाचे वाटप करण्यासाठी देण्यात आलेल्या १३७ कोटी रुपयांच्या कर्ज वाटप उद्दिष्टापैकी १५ सप्टेंबरअखेर १३० कोटी ७८ लाख रुपयांचे म्हणजे ९५.४६ टक्के पीक कर्ज वाटप करण्यात आले. याबाबतची माहिती, बुधवारी जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या जिल्हास्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत बँक आॅफ इंडियाचे जिल्हा अग्रणी बँक अधिकारी टी.मधुसूदन यांनी दिली.
रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने १०५.१५ टक्के, बँक आॅफ महाराष्ट्रने ११२.६७ टक्के, इंडियन ओव्हरसिज बँक १६०.३० टक्के, आय.डी.बी.आय.बँकेने १०४.३६ टक्के, बँक आॅफ बडोदाने १०४.८ टक्के तर बँक आॅफ इंडिया १००.६० टक्के असे उद्दिष्टापेक्षा अधिक कर्जाचे वाटप करुन शेतकऱ्यांच्या कृषी गरजा भागवण्याकरिता महत्वपूर्ण कामगिरी केली आहे. जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांनी १०० टक्केपेक्षा अधिक पीक कर्ज वाटप केलेल्या बँकांचे या बैठकीत विशेष अभिनंदन केले आहे.
जिल्ह्यातील बँकांनी त्यांच्याकडे आलेल्या ग्राहकांकडे मानवी दृष्टिकोनातून पहावे, त्यांना सन्मानाची वागणूक द्यावी, तसेच शासनाने विविध योजनेअंतर्गत कर्जवाटपासाठी बँकांना दिलेल्या उद्दिष्टांची पूर्ती १०० टक्के कशी होईल याकडे अधिक लक्ष द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांनी यावेळी बोलताना केले.
जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले म्हणाल्या की, बँका केवळ ठेवी स्वीकारण्यासाठीच नसून कर्ज वाटप करण्यासाठीसुध्दा आहेत. एखाद्या व्यक्तीस दिलेले कर्ज हे त्या व्यक्तीच्या कुटुंबासाठी न रहाता त्याचे कळत नकळत परिणाम इतरांवरही होतात, याचा विचार सर्व बँकर्सनी करावा.
त्यांच्याकडे कर्ज मागणीसाठी आलेल्या ग्राहकांची हेळसांड करु नये, कर्ज देताना गरजूंची योग्य वेळ साधून मदत करावी असेही त्यांनी
सांगितले.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अविनाश गोटे, महाराष्ट्र बँकेचे झोनल मॅनेजर सुरेश परब, बँक आॅफ इंडियाचे झोनल मॅनेजर शिव सिंग, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक तसेच लिड बँक अधिकारी टी. मधुसूदन यांच्यासह जिल्ह्यातील सर्व बँकांचे प्रतिनिधी, जिल्हा माहिती अधिकारी डॉ.राजू पाटोदकर आदी मान्यवरांसह अधिकारी- कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(विशेष प्रतिनिधी)

Web Title: 130 crore loan allocation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.