१० हजार शेतकऱ्यांना हवी नुकसानभरपाई
By Admin | Updated: May 23, 2016 03:11 IST2016-05-23T03:11:43+5:302016-05-23T03:11:43+5:30
खारबंदिस्तीची कामे योग्य न झाल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये खारे पाणी घुसून सुमारे तीन हजार एकर शेती नापीक झाल्याचा दावा श्रमिक मुक्ती दलाने केला आहे.

१० हजार शेतकऱ्यांना हवी नुकसानभरपाई
आविष्कार देसाई, अलिबाग
खारबंदिस्तीची कामे योग्य न झाल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये खारे पाणी घुसून सुमारे तीन हजार एकर शेती नापीक झाल्याचा दावा श्रमिक मुक्ती दलाने केला आहे. हे दुष्टचक्र तोडून २६ वर्षांपासूनची सुमारे ३९० कोटी रुपयांची नुकसानीच्या भरपाईची मागणी करण्यासाठी १० हजार शेतकरी संघटित झाले आहेत. खारभूमी विभागाला एवढ्या मोठ्या रकमेची नुकसानभरपाई देताना चांगलाच घाम फुटणार असल्याचे बोलले जाते. आयुष्यभर काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र सुगीचे दिवस येणार असल्याचे दिसून येते. सोमवारी जिल्हाधिकारी याप्रश्नी बैठक घेणार आहेत.
२ एप्रिल २०१६ रोजी पेण येथील खारभूमी सर्वेक्षण व अन्वेषण विभागाचे कार्यकारी अभियंता यांची बैठक श्रमिक मुक्ती दलासोबत पार पडली होती. त्यानंतर खारभूमीला जाग आली. जमेची बाजू म्हणजे जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी यांनी कुर्डूस ते मानकुळे या खारेपाटातील नापीक जमिनीची माहिती घेण्याची सूचना खारभूमी विकास उपविभागाचे सहायक कार्यकारी अभियंता एस.पी.पवार यांनी केली आहे. याबाबतचे पत्रच त्यांनी २९ एप्रिल २०१६ रोजी कृषी विभागाला पाठवले आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये प्रतिवर्षी एकरी २० क्विंटलहून अधिक भाताचे उत्पादन होत होते. तसेच त्यामाध्यमातून किमान ५२ लोकांना रोजगार मिळत होता. शेतीच्या बांधावर भाजीपाला पिकवला जात होता. १०० किलो मासे नैसर्गिकरीत्या मिळत होते. मात्र शेतीमध्ये खारेपाणी घुसून शेतीचे नुकसान झाले. त्यामुळे आर्थिक कणा मोडल्याने शेतकरी हवालदिल झाला होता.
संरक्षक बंधाऱ्यांची योग्य निगा व दुरुस्ती न केल्याने जमीन नापीक झाली. दरवर्षी ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. जमीन पुन्हा सुपीक करण्यासाठी किमान एक लाख रुपये खर्च येणार आहे. त्यामुळे खारभूमी विभागाने जमीन नापीक झाल्यापासून आजपर्यंतची नुकसानभरपाई आठ टक्के व्याजासहित देण्याची मागणी अभिमन्यू वाघ या शेतकऱ्याने खारभूमी विभागाकडे लेखी केली आहे. अर्ज दाखल करणार
मेढेखार, देहनकोनी, काचळी पिटकरी, शहाबाज, कमळपाडा, धामणपाडा, सोनकोठा, हाशिवरे येथील सुमारे १० हजार शेतकरी ३००० एकर शेतीसाठी ५० हजार रु. एकरी नुकसानभरपाईसाठी अर्ज २६ मे रोजी दाखल करणार असल्याचे डॉ. भारत पाटणकर यांनी सांगितले.विशेष बैठक आज
खारभूमी विभागाने कृषी विभागाला सर्वेक्षण करण्याबाबत कळविले आहे. सोमवारी जिल्हाधिकारी यांच्याकडे याबाबत विशेष बैठक बोलावण्यात आली आहे. बैठकीला संबंधित विभागासह श्रमिक मुक्ती दलालाही बोलवले असल्याचे खारभूमी विभागाचे उपअभियंता सुरेश शिरसाट म्हणाले.
> योजनेचे नावक्षेत्र हेक्टर
फणसापूर कुर्डूस खारभूमी योजना १५६
कोपरी चिखली खारभूमी योजना ५२
काचली पिटकरी खारभूमी योजना ३३४
मेढेखार खारभूमी योजना १७६
देहेनकोनी खारभूमी योजना १६९
शहाबाज खारभूमी योजना४९८
कमळपाडा धामणपाडा खारभूमी योजना ३५०
धाकटापाडा शहापूर खारभूमी योजना ३४५
मोठापाडा शहापूर (खासगी) खारभूमी योजना ४२३
धेरंड खारभूमी योजना १४९
सोनकोठा खारभूमी योजना२६५
मानकुळे खारभूमी योजना ५००
एकूण३४१७