महापालिकेचे १० हजार कोटींचे उत्पन्न

By Admin | Updated: August 31, 2015 03:31 IST2015-08-31T03:31:40+5:302015-08-31T03:31:40+5:30

एलबीटी रद्द झाल्यामुळे महापालिकेपुढे आर्थिक संकट उभे राहिले आहे. उत्पन्न घटले असले तरी पालिकेची मालमत्ता कमी झालेली नाही. दोन दशकांच्या काळात तब्बल

10 thousand crores of municipal corporation generated | महापालिकेचे १० हजार कोटींचे उत्पन्न

महापालिकेचे १० हजार कोटींचे उत्पन्न

नामदेव मोरे,नवी मुंबई
एलबीटी रद्द झाल्यामुळे महापालिकेपुढे आर्थिक संकट उभे राहिले आहे. उत्पन्न घटले असले तरी पालिकेची मालमत्ता कमी झालेली नाही. दोन दशकांच्या काळात तब्बल १०,६४९ कोटी रुपयांचा महसूल जमा केला असून तो विविध कामांवर खर्च केला आहे. पालिकेच्या ताब्यात मोरबे धरणासह तब्बल १५६३ मालमत्ता असून त्यांची किंमत जवळपास १५ हजार कोटी रुपयांची आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या उत्पन्नामध्ये सेस व नंतर एलबीटीचा मोठा वाटा होता. शासनाने एलबीटी रद्द केल्यामुळे पालिकेपुढे मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या अनावश्यक कामांमुळे तब्बल १२९५ कोटींचा स्पील ओव्हर तयार झाला आहे. याशिवाय जवळपास एक हजार कोटींच्या कामांचा कार्यादेश देणे शिल्लक आहे. पुढील वर्षभरामध्ये १४०० कोटी रुपयांची कामे प्रस्तावित आहेत. पालिकेवर तब्बल ८५३ कोटी ७३ लाख रुपयांचे कर्ज आहे. शासनाने अनुदान वेळेत दिले नाही तर पुढील किमान एक ते दोन वर्षे अनावश्यक खर्च बंद करावा लागणार आहे. जी कामे अत्यंत आवश्यक आहेत तीच करावी लागणार आहेत. पैशांचा अत्यंत काटेकोर वापर करावा लागणार आहे. महापालिकेने सुरू असलेली कामे पूर्ण करण्यावर लक्ष देण्याचे निश्चित केले असून नवीन कामे काढली जाणार नसल्याचे सूतोवाच केले आहे. मागील दोन वर्षामध्ये कामांचे योग्य नियोजन झाले नसल्यामुळे स्पील ओव्हर वाढत चालला आहे. पालिकेचा कोणताही महत्त्वाचा प्रकल्प वेळेत पूर्ण होत नाही. प्रकल्प रखडल्यामुळे त्यांची रक्कम दुप्पट होवू लागली असून त्यामुळे आर्थिक गणित बिघडले आहे.
पालिकेच्या उत्पन्नावर परिणाम झाला असला तरी महापालिका पूर्णपणे आर्थिक दिवाळखोरीमध्ये गेल्याचे चित्र नाही. महापालिकेने विशेष सर्वसाधारण सभेमध्ये सादर केलेल्या आर्थिक ताळेबंदातून पालिकेची चांगली व वाईट दोन्ही बाजू समोर आल्या आहेत. मागील वीस वर्षांमध्ये पालिकेने विविध मार्गांनी जब्बल १०,६४९ कोटी रुपयांचा महसूल जमा केला आहे. या महसुलाच्या माध्यमातून मोरबे धरण, ४३८ किलोमीटर लांबीचे रस्ते, मुख्य रस्त्यांचे काँक्रीटीकरण, शाळा, समाजमंदिर, स्कायवॉक, २०० उद्याने, क्रीडांगणे व इतर अशा एकूण १५६३ मालमत्ता उभ्या केल्या आहेत. फक्त मोरबे धरण परिसरात पालिकेच्या ताब्यात १८०० एकर जमीन आहे.
7.62 लाख चौरस मीटर क्षेत्रफळावर उद्याने विकसित केली आहेत. पालिकेच्या एकूण मालमत्तांची एकूण रक्कम १५ हजार कोटींपेक्षा जास्त झाली आहे. उत्पन्नाचे स्रोत वाढविले नाहीत तर भविष्यात आर्थिक घडी बिघडण्याची शक्यता आहे.

शहरवासीयांना चांगली आरोग्य सुविधा देण्यात अपयश
मुख्यालयासह सर्व महत्त्वाचे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यात अपयश
चुकीच्या नियोजनामुळे मोठ्या प्रकल्पांचा खर्च दुप्पट
मलनिस्सारण केंद्रातील शुद्ध केलेल्या पाण्याची विक्री करण्यास अपयश
गरज नसताना रस्ते व पदपथांची वारंवार दुरूस्ती व नवीन कामे
समाजमंदिर,मार्केट व इतर इमारतींचा वापर नाही
पाणी मुबलक असल्यामुळे मोठ्याप्रमाणात उधळपट्टी
पालिकेच्या कारभाराला आर्थिक शिस्त नाही
जाहिरात, परवाना व इतर विभागांचे उत्पन्न वाढविण्याकडे दुर्लक्ष
मालमत्ता कराची गळती थांबविण्याकडेही दुर्लक्ष
शहरवासीयांना चांगली वाहतूक सुविधा देण्यात एनएमएमटीला अपयश

Web Title: 10 thousand crores of municipal corporation generated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.