क्रीडांगणासाठी १० लाख
By Admin | Updated: November 2, 2015 02:08 IST2015-11-02T02:08:44+5:302015-11-02T02:08:44+5:30
विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रात योग्य प्रावीण्य मिळावे यासाठी सुसज्ज क्रीडांगण होण्यासाठी कोलाड व सुतारवाडी येथील क्रीडांगणासाठी दहा लाख रुपयांचा निधी

क्रीडांगणासाठी १० लाख
पाली : विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रात योग्य प्रावीण्य मिळावे यासाठी सुसज्ज क्रीडांगण होण्यासाठी कोलाड व सुतारवाडी येथील क्रीडांगणासाठी दहा लाख रुपयांचा निधी आ. सुनील तटकरे यांच्या आमदार फंडातून दिला जाईल अशी घोषणा आ. अनिल तटकरे यांनी केली. सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या सुतारवाडी येथील द.ग. तटकरे माध्यमिक विद्यालयाच्या नवीन इमारत बांधकामाचे भूमिपूजन आमदार सुनील तटकरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
आ. सुनील तटकरे म्हणाले, माझ्या रायगड जिल्ह्यात असलेल्या या संस्था शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या भौतिक सोयी-सुविधा कर्ज काढून पुरविण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत असतात. यातील एक नंबरची सुधागड एज्युकेशन सोसायटी आहे आणि या संस्थेचे आम्ही सर्व भावंडे विद्यार्थी आहोत, याचा अभिमान मला आहे असे गौरवाद्गार त्यांनी काढले.
यावेळी प्रास्ताविकात अध्यक्ष वसंत ओसवाल म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी संस्थापक अध्यक्ष कै. दादासाहेब लिमये व स्व. दत्ताजी तटकरे यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने बांधलेल्या इमारतीला ४६ वर्षे झाली. शिक्षणाचे काम सातत्याने सुरू रहावे या हेतूने व विद्यार्थ्यांना शैक्षणिक वातावरण आणि भौतिक सोयी-सुविधा मिळणे आताच्या काळात गरजेचे असल्यामुळे दहा हजार पाचशे स्क्वे. फुटाची सुसज्ज इमारत संस्थेने आरडीसी बँकेकडून कर्जपुरवठा घेवून बांधकाम करण्याचे ठरवले. या इमारतीचे बांधकाम १५ मेपर्यंत पूर्ण करून नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना नव्या इमारतीत बसायला मिळेल. अकरा तुकड्यांवरून आज चारशे अठरा विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या पुढील काळात विद्यार्थ्यांची संख्या वाढण्याच्या दृष्टीने मुख्याध्यापक व शिक्षकांनी प्रयत्न करणे जरुरीचे आहे, असे प्रतिपादन ओसवाल यांनी यावेळी केले. यावेळी आ. अवधूत तटकरे, राजिपचे शिक्षण सभापती भाई पाशिलकर, युवा नेते अनिकेत तटकरे, सुजाता गोपाळे, मेघा निळेकर आदी उपस्थित होते. (वार्ताहर)