बैतूल: मध्य प्रदेशच्या बैतूलमध्ये एक अजब घटना घडली आहे. एका तरुणानं जीवन संपवण्यासाठी तीनवेळा आत्महत्येचा प्रयत्न केला. सध्या तरुणाची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती सध्या गंभीर आहे.
चिचोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पाठाखेडामध्ये वास्तव्यास असलेल्या रविंद्र कटारेनं तीनवेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. अधिक दारू प्यायल्यानं मृत्यू होतो असं कोणीतरी रविंद्रला सांगितलं होतं. त्यामुळे रविंद्र खूप दारू प्यायला. मात्र त्याचा मृत्यू झाला नाही. त्यामुळे रविंद्रनं विष खाल्लं. तरीही मृत्यूनं न गाठल्यानं रविंद्रनं गळफास लावून घेतला. ओळखीच्या व्यक्तींनी त्याला चिचोली सीएचसीमध्ये दाखल केलं. मात्र नंतर त्याला जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं.
रविंद्र कटारेचं वय ३५ वर्षे असून त्याची स्वत:ची टॅक्सी आहे. 'रविंद्र आधी बेशुद्ध होईपर्यंत दारू प्यायला. ज्यावेळी तो शुद्धीवर आला, त्यावेळी त्यानं विष खाल्लं. त्यानंतरही जीव वाचल्यानं त्यानं गळफास लावून घेतला. त्याच्या शरीरातील विषारी पदार्थ काढण्यात आला आहे. मात्र त्याची प्रकृती गंभीर आहे. रविंद्र उपचाराला सहाय्य करत असल्यानं अडचणी येत आहेत,' अशी माहिती डॉ. अजय महोरेंनी दिली.
रविंद्र विष खाऊन गळफास घेतल्याचं समजताच त्याला रुग्णालयात दाखल केल्याचं भाऊ विनोदनं सांगितलं. वहिनीसोबत भांडण झाल्यानं रविंद्रनं टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगण्यात येत आहे. त्यानं नेमकं काय खाल्लं याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. विषारी पदार्थ खाल्ल्यानंतर त्यानं घरातच गळफास लावण्याचा प्रयत्न केला. त्याला योग्यवेळी कुटुंबियांनी पाहिलं आणि रुग्णालयात नेलं. त्याच्या जीवाला असलेला धोका कायम आहे.