इस्राइल आणि हमास यांच्यात गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या संघर्षामध्ये गाझामध्ये हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. इस्राइलच्या भयंकर हल्ल्यांमध्ये गाझापट्टी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. या संघर्षावरून काँग्रेच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी इस्राइलवर गंभीर आरोप केले होते. तसेच इस्राइलच्या हल्ल्यात ६० हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्याचा आणि त्यात १८ हजार ४३० मुलांचा समावेश असल्याचा आरोप त्यांनी केला होता. प्रियंका गांधी यांच्या या आरोपांवर इस्राइलकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली असून, तुमचं वक्तव्य लाजिरवाणं आहे. आम्ही हमासचे दहशतवादी मारले आहेत, असा दावा इस्राइलने केला आहे.
प्रियंका गांधी यांनी इस्राइलकडून गाझामध्ये सुरू असलेल्या अत्याचारांविरोधात सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून संताप व्यक्त केला. त्यात त्यांनी लिहिले की, इस्राइल गाझामध्ये नरसंहार करत आहे. यामध्ये त्यांनी ६० हजारांहून अधिक लोकांना ठार मारलं आहे. त्यात १८ हजार ४३० मुलांचाही समावेश आहे. शेकडो लोकांना उपासमारीने मरण्यासाठी सोडण्यात आलं आहे. त्यात अनेक मुलांचाही समावेश आहे. आता लाखो लोकांना उपाशी मारण्याची धमकी दिली जात आहे.
त्यांनी पुढे लिहिले की, या गुन्ह्यांना मौन बाळगून आणि डोळेझाक करून प्रोत्साहन देणं हाही एक गुन्हाच आहे. या सर्व प्रकाराबाबत भारत सरकार मौन बाळगून आहे. तर इस्राइल पॅलेस्टाइनच्या नागरिकां सातत्यावन उद्ध्वस्त करत आहे.
दरम्यान, प्रियंका गांधी यांनी केलेल्या या आरोपांना इस्राइलचे भारतामधील राजदूत रेवुएन अजार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, तुम्ही करत असलेली चुकीची विधानं लाजिरवाणी आहेत. इइस्राइलने आतापर्यंत हमासच्या २६ हजार दहशतवाद्यांना मारलं आहे. तसेच यादरम्यान, मानवी जीवनाला झालेलं नुकसान हे हमासच्या गलिच्छ रणनीतीचा परिपाक आहे. हमासचे दहशतवादी सर्वसामान्य नागरिकांचा ढालीसारखा वापर करून त्यांच्यामागे लपत आहेत. तसेच मदत आणि बचावकार्य करणाऱ्यांवर गोळीबार कऱणे, रॉकेट डागणे असली कृत्ये करत आहेत, असा दावाही त्यांनी केला.
रेवुएन अजार पुढे म्हणाले की, इस्राइलने गाझामध्ये २० लाख टन अन्नपदार्थ पाठवले. मात्र हमासने ते जप्त करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे उपासमारीची स्थिती निर्मा झाली. गाझाची लोकसंख्या मागच्या ५० वर्षांमध्ये ४५० टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे तिथे नरसंहाराचा कुठलाही प्रश्नच निर्माण होत नाही, असा दावाही त्यांनी केला.