आपने दिल्लीवासियांच्या पाठीत खंजीर खुपसला - नरेंद्र मोदी
By Admin | Updated: January 31, 2015 19:24 IST2015-01-31T17:44:33+5:302015-01-31T19:24:53+5:30
गेल्या वर्षी तुम्ही ज्यांना गादीवर बसवलंत त्यांनी तुमच्या पाठीत खंजीर खुपसला, त्यांच्यामुळे दिल्लीचे एक वर्ष वाया गेले असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आम आदमी पक्षावर जोरदार हल्ला चढवला.

आपने दिल्लीवासियांच्या पाठीत खंजीर खुपसला - नरेंद्र मोदी
>
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३१ - गेल्या वर्षी तुम्ही ज्यांना गादीवर बसवलंत त्यांनी तुमच्या पाठीत खंजीर खुपसला, त्यांच्यामुळे दिल्लीचे एक वर्ष वाया गेले असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आम आदमी पक्षावर जोरदार हल्ला चढवला. 'आप'ला मत देऊन दिल्लीकरांनी पुन्हा चूक करू नये असे आवाहनही त्यांनी केले. दिल्लीला स्थिर सरकार आणि अनुभवी मुख्यमंत्री हव्या आहेत, असे सांगत दिल्लीवासियांनी भाजपला बहुमताने जिंकून द्यावे असेही ते म्हणाले. दिल्ली विधानसभा निवडणूक अवघी आठवड्यावर आली असून प्रचारासाठी अवघे चार दिवस उरले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी जाहीर सभा घेत अरविंद केजरीवाल व आपवर कडाडून हल्ला चढवला.
लोकसभा निवडणुकीत 'आप'ला मार खावा लागला, त्यांनी सर्वाधिक जागांवर डिपॉझिट जप्त होण्याचा विक्रम नोंदवला आहे, असे असतानाही ते मतं मागत आहेत, अशा शब्दांत त्यांनी आपची खिल्ली उडवली. खोट बोलून एकदा यश मिळतं, वारंवार नाही असा टोलाही त्यांनी लगावला.
दिल्लीकरांनी मला बोलावलं म्हणून मी आज इथे आहे, पण मी खुर्चीत बसण्यासाठी नव्हे तर लोकांची सेवा करण्यासाठी आलो आहे, असेही ते म्हणाले.
यावेळी त्यांनी भाजपाच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदींचे कौतुक करत त्यांच्या उमेदवारीचे समर्थन केले. बेदींना दिल्लीची चांगली माहिती आहे, त्यांना प्रशासनाचाही चांगला अनुभव आहे, त्यामुळे त्या दिल्लीला वेगळ्या उंचीवर नेतील, असा विश्वासही त्यांनी सभेत व्यक्त केला.