निर्भयावर बलात्कार करणा-याला आप सरकार आर्थिक मदत देणार
By Admin | Updated: December 15, 2015 12:04 IST2015-12-15T10:15:12+5:302015-12-15T12:04:54+5:30
निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील अल्पवयीन दोषीला केजरीवाल सरकार आर्थिक मदत करणार आहे.

निर्भयावर बलात्कार करणा-याला आप सरकार आर्थिक मदत देणार
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १५ - निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील अल्पवयीन दोषीची येत्या २० डिसेंबरला सुटका होण्याची शक्यता आहे. गुप्तचरयंत्रणांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे केंद्र सरकारने या आरोपीच्या सुटकेबद्दल चिंता व्यक्त केली असताना, दिल्लीतील केजरीवाल सरकार या अल्पवयीन आरोपीचे पुनर्वसन करण्यासाठी त्याला रोख १० हजार रुपये आणि शिलाई मशीन देणार आहे.
दिल्ली सरकारच्या महिला आणि बाल विकास खात्याने या अल्पवयीन आरोपीच्या पुनर्वसनाची योजना न्यायालयात सादर केली. या योजनेनुसार दिल्ली सरकारकडून आरोपीला १० हजार रुपये रोख आणि चरितार्थ चालवण्यासाठी शिलाई मशीन दिले जाईल. हा अल्पवयीन आरोपी आता २० वर्षांचा झाला आहे.
केंद्र सरकारला या अल्पवयीन आरोपीच्या मानसिक आरोग्याची चिंता आहे. त्यामुळे त्याची सुटका करु नये असे केंद्र सरकारचे मत आहे. दिल्ली सरकारच्या पूर्नवसन योजनेवरही केंद्र सरकारने टीका केली आहे. अल्पवयीन आरोपीच्या सुटकेसंदर्भातील याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल असून, न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला आहे.