"अंदाधूंदपणे लोकांना बोलवण्यात आले. अशी संधी पुन्हा मिळणार नाही. गर्दी व्यवस्थापन केले गेले नाही. लोक मेले तर त्यांचे मृत्यू लपवण्याचे काम तुमच्याकडून झाले. हा तर गुन्हा होता. अशा परिस्थितीत याचा जर कोणी काही उल्लेख करत असेल, तर आम्ही त्याला चुकीचे म्हणून शकत नाही", असे म्हणत शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज यांनी उत्तर प्रदेश सरकारच्या महाकुंभ नियोजनाचे वाभाडे काढले.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मला कुंभ मेळ्याबद्दल आदर आहे. गंगा नदीबद्दल आदर आहे. पण हा कुंभ नाही, तर मृत्यू कुंभ आहे, असे विधान केले होते. त्यावर बोलताना शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज यांनी मृत्यू कुंभ शब्दाचे समर्थन केले.
शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज काय बोलले?
"बघा, ही राजकीय पक्षाची भाषा असते. जेव्हा संधी मिळते, तेव्हा ते लोक त्यांच्या पद्धतीने त्यांचे भूमिका मांडतात. पण, एक सनातनी या नात्याने, कुंभमेळ्यात जाऊन परत आलो असल्याने आणि मीडियाच्या माध्यमातून परिस्थिती बघून, समजल्यावर मी काय म्हणायला हवे? तीनशे किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी होत असेल, तर हे अव्यवस्था नाही तर काय आहे?", असा सवाल शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज यांनी केला.
शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज पुढे म्हणाले, "जे लोक तिथे आले आहेत, २५-३० किलोमीटर त्यांना पायी चालावं लागत आहे. सामान घेऊन, हे ढिसाळ नियोजन नाही तर काय आहे? जे पाणी तिथे स्नानासाठी येत आहे. त्यामध्ये गटारातून येणारं मलमूत्राचं पाणी मिसळलेलं आहे. ते अंघोळीसाठी चांगलं नसल्याचे वैज्ञानिक म्हणत आहेत. आणि त्यात अंघोळ करण्यासाठी तुम्ही कोट्यवधी लोकांना भाग पाडले आहे", असे म्हणत शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज यांनी उत्तर प्रदेश सरकारवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.
स्नान करायला शुद्ध पाणी मिळाले नाही
"ते श्रद्धेपोटी स्नान करत आहेत, ही वेगळी बाब आहे; पण तुमचं काम होतं की, गटारं काही दिवस बंद करायची होती किंवा ती दुसरीकडे वळवायची होती. कमीत कमी स्नान करताना प्रवाहातील शुद्ध पाणी त्यांना मिळू शकलं असतं. ते करू शकले नाहीत, मग याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ आहे की, नियोजन नाहीये", अशा शब्दात शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज यांनी सुनावले.
"तुम्हाला पहिल्यापासून माहिती होतं. तुम्हाला सहा वर्षांपूर्वी माहिती होतं की, कुंभमेळा येणार आहे. १२ वर्षांपूर्वी माहिती होतं की, कुंभमेळा होणार आहे. मग तुम्ही यासंदर्भात काहीच प्रयत्न का केले नाहीत. नियोजन नसल्यामुळेच तर इतके सारे लोक मारले गेले आहेत. जर आधीपासूनच माहिती होतं की, लोक येणार आहेत आणि आपल्याकडे इतकीच जागा आहे, तर त्याचं नियोजन करायला पाहिजे होतं की नाही?
कुंभमेळा होणार हे तुम्हाला आधीपासून माहिती होतं -शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद महाराज
"अव्यवस्था आहे आणि जर त्यावर कोणी काही बोलत असेल, तर त्यात आम्ही काय करायचं? आम्ही कुणाची बाजू घेणार नाही, पण जे सत्य आहे, ते तर हेच आहे. तुम्हाला आधीपासून माहिती होतं की, कुंभमेळा येणार आहे तर तुम्ही नियोजन करायला हवे होते. तीन-चार योजना बनवून ठेवायला हव्यात होत्या, जेणेकरून एक अपयशी ठरली तर दुसरी कामाला असती. तुम्ही कोणतेही नियोजन केले नाही", असे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज म्हणाले.
"खोटा प्रचार केला. १४४ सालानंतर... १४४ वर्षांनंतर कुंभ असल्याची गोष्टच खोटी आहे. ते सांगून लोकांचे तुम्ही लक्ष वेधून घेतले आणि तुमच्याकडे तितकी व्यवस्था नव्हती. जर तुमच्या लोकांना देण्यासाठी अन्न नाही, तर लोकांना आमंत्रित का करत आहात? लोक येतील पण खाणार काय? तुमच्याकडे ना लोकांसाठी अन्न आहे, ना त्यांना राहण्यासाठी जागा आहे. असे होते का?", असे ते म्हणाले.
जितक्या लोकांची व्यवस्था तुम्ही करू शकता, तितक्या लोकांना आमंत्रित करा. आणि तितक्या लोकांची व्यवस्था करा. मुख्यमंत्र्यांनी (योगी आदित्यनाथ) हे का सांगितले नाही की, त्यांच्याकडे किती एकर जागा आहे? किती रस्ते आहेत? किती वाहनांसाठी जागा आहे? तितक्याच लोकांनी यावे. अव्यवस्था बिघडू नये म्हणून बाकीच्यांनी येऊ नये. कुणाचे जीव जावेत असे मला वाटत नाही. याबद्दल सतर्क का केले गेले नाही?", असा प्रश्न शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज यांनी योगी आदित्यनाथ यांना केला.