‘आप’च बाप!
By Admin | Updated: February 11, 2015 06:34 IST2015-02-11T06:34:42+5:302015-02-11T06:34:42+5:30
गेल्या लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील सर्व सातही जागा जिंकणाऱ्या आणि विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी

‘आप’च बाप!
नवी दिल्ली : गेल्या लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील सर्व सातही जागा जिंकणाऱ्या आणि विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांची प्रतिष्ठा पणाला लावणाऱ्या भाजपाच्या दृष्टीने हा पराभव नियतीने घेतलेला सूडच म्हणावा लागेल.
एक, म्हणजे ‘काँग्रेसमुक्त दिल्ली’चे त्यांचे स्वप्न साकार झाले, पण हे कर्तृत्व त्यांच्या हातून न घडता ते ‘आप’ने करून दाखविले. दुसरे असे की, दिल्लीची सत्ता काबीज करायला निघालेल्या भाजपाला ७०पैकी केवळ ३ जागा मिळाल्याने लाज राखणेही मुश्किल झाले. तिसरे असे की, मे महिन्यापासून चौखूर उधळलेल्या मोदी लाटेच्या वारूला ‘आप’च्या ‘झाडू’ने चारी मुंड्या चीत करून फेंफरे आणले! सर्वांत झोंबणारी गोष्ट अशी की, या निवडणुकीचा ‘फोकस’ मोदींपासून दूर राहावा म्हणून भाजपाने किरण बेदींना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून मैदानात उतरविले. पण बेदींनाही त्यांना निवडून आणता आले नाही.
लोकसभा निवडणुकीत ४४ जागा मिळालेल्या काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपदही न देणाऱ्या भाजपाच्या वाट्याला तीच नामुश्की दिल्ली विधानसभेत आली. काँग्रेसचे मुख्यमंत्रिपदाचे अघोषित
उमेदवार अजय माकन हेही पडझडीत टिकाव धरू शकले नाहीत. पराभवाची जबाबदारी स्वीकारून त्यांनी पक्षाच्या सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला.
> दिल्लीत झालेल्या राजकीय भूकंपाने संपूर्ण देश हादरून गेला. अवघ्या दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने (आप) मोदी लाटेवर स्वार होऊन मस्तवाल झालेल्या भाजपाला धूळ चारत आणि शरपंजरी पडलेल्या काँग्रेसला पूर्णपणे नामशेष करीत राजधानीची सत्ता न भूतो अशा बहुमताने पुन्हा काबीज केली. गेल्या वर्षभराच्या राजकीय अस्थिरतेनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत दिल्लीच्या मतदारांनी ‘पाच साल, केजरीवाल’ असा ठणठणीत कौल देत सर्वांचीच बोलती बंद केली.
> संपूर्ण दिल्ली आपमय
आम आदमी पार्टीने मिळविलेल्या ऐतिहासिक विजयानंतर संपूर्ण दिल्लीत ‘पाच साल केजरीवाल’चे नारे लागत होते. सर्व ठिकाणी आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते जल्लोष करत होते.