Prayagraj Mahakumbh Stampede : प्रयागराज : महाकुंभमेळ्यात आज मौनी अमावस्येला अमृत स्नान करण्यासाठी संगम किनाऱ्यावर मोठ्या संख्येने भाविक आले. यावेळी मंगळवारी रात्री झालेल्या गर्दीमुळे एकच गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली. या चेंगराचेंगरीत अनेक जण जखमी झाले आहेत. तर दहा जणाचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, मृत्यूबाबत अद्याप अधिकृत आकडेवारी समोर आलेली नाही.
या घटनेनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अफवांकडे लक्ष देऊ नका, असे आवाहन भाविकांना केले आहे. तसेच, योगी आदित्यनाथ म्हणाले की, काही भाविक गंभीर जखमी झाले आहेत आणि सुरक्षित स्नान सुनिश्चित करण्यासाठी प्रशासन सतत सक्रिय आहे. पहाटे १-२ वाजता भाविकांनी बॅरिकेड्स ओलांडून उड्या मारल्या. त्यावेळी ही घटना घडली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोनद्वारे सकाळपासून चार वेळा भाविकांच्या व्यवस्थेची आणि जखमींच्या प्रकृतीची विचारपूस केल्याचे योगी आदित्यनाथ यांनी सांगितले. तसेच, यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि जेपी नड्डा यांनीही फोन केला आहे. राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी सतत माहिती घेतली आहे, प्रत्येकजण सतत माहिती घेत आहेत, असे योगी आदित्यनाथ यांन सांगितले.
याचबरोबर, भाविकांना व्यवस्थित स्नान करता यावे म्हणून मोठी बैठक आयोजित केली जात आहे. भाविकांनी अफवांकडे लक्ष देऊ नये, केंद्र आणि राज्य सरकार पूर्ण ताकदीने सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे. जर कोणी नकारात्मक अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला, तर त्यामुळे नुकसान होऊ शकते, असे योगी आदित्यनाथ म्हणाले.
प्रयागराजमधील परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे, पण गर्दी अजूनही खूप जास्त आहे. संतांसोबत सुद्धा चर्चा झाली आहे. त्यांनी आम्हाला अतिशय विनम्रपणे सांगितले आहे की, आधी भाविक स्नान करतील आणि निघून जातील, त्यानंतरच आम्ही स्नानासाठी संगमाकडे जाऊ. सर्व आखाडे यावर सहमत आहेत. तसेच, महाकुंभ मेळ्याचे आयोजन लोकांसाठी आहे. प्रशासन त्यांच्या सेवेसाठी समर्पित आहे. त्यामुळे स्नान करण्यासाठी फक्त संगम किनाऱ्यावर येणे आवश्यक नाही. तर १५-२० किलोमीटरच्या परिघात तात्पुरते घाट बांधले आहेत, त्याठिकाणी भाविकांनी स्नान करावे, असे आवाहनही योगी आदित्यनाथ यांनी केले आहे.
कशी झाली दुर्घटना?मौनी अमावस्येमुळे गंगा स्नान करण्यासाठी मंगळवारी रात्री २ वाजल्यापासून संगम किनाऱ्यावर भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. त्यावेळी सुरक्षेसाठी लावलेले बॅरिकेड्स तुटले आणि एकच गोंधळ उडाला. त्यामुळे दोन्ही बाजूने चेंगराचेंगरी झाली. काही मिनिटांत परिस्थिती चिघळली. लोक जीव वाचवण्यासाठी धावू लागले. काही भाविकांचे सामान खाली पडले. त्यात लोक एकमेकांना मागे सारून पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते. गर्दी नियंत्रणातून बाहेर गेल्याने चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.