यंदा पावसाळा नेहमीसारखाच; निराशेचे ढग दूर

By Admin | Updated: June 7, 2015 23:26 IST2015-06-07T23:26:53+5:302015-06-07T23:26:53+5:30

भारतीय हवामान खात्याने यंदाचा पाऊस सर्वांचीच निराशा करील असे भाकीत वर्तवले असतानाच ‘स्कायमेट’ या हवामानविषयक खासगी कंपनीने मात्र हे निराशेचे ढग दूर करणारी वार्ता दिली.

This year is like regular monsoon; Removing frustrated clouds | यंदा पावसाळा नेहमीसारखाच; निराशेचे ढग दूर

यंदा पावसाळा नेहमीसारखाच; निराशेचे ढग दूर

नवी दिल्ली : भारतीय हवामान खात्याने यंदाचा पाऊस सर्वांचीच निराशा करील असे भाकीत वर्तवले असतानाच ‘स्कायमेट’ या हवामानविषयक खासगी कंपनीने मात्र हे निराशेचे ढग दूर करणारी वार्ता दिली. यंदा पावसाळा नेहमीसारखा राहील, असा अंदाज ‘स्कायमेट’ने वर्तवला आहे.
‘स्कायमेट’ने मान्सूनवर प्रभाव टाकणाऱ्या अल-निनोला फारसे महत्त्व न देता, यावर्षी अल-निनोचा परिणाम राहणार नसल्याचे म्हटले आहे. प्रशांत महासागराच्या तळाशी निर्माण होणाऱ्या अल-निनो या गरम पाण्याच्या प्रवाहामुळे जगाच्या विविध भागात पूर आणि अवर्षणाची स्थिती संभवते. याच अल-निनोच्या आधारे हवामान खात्याने यंदा कमी पाऊस पडण्याचे भाकित वर्तवले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)


> ‘स्कायमेट’चे मुख्य कार्यकारी अधिकारी जतीन सिंह यांनी आपल्या संकेतस्थळावरील ब्लॉगमध्ये यंदा पावसाळा नेहमीसारखाच राहील, असे भाकीत वर्तवले आहे. अल-निनो जर सलग दोन वर्षे वाहत असेल तर त्याच्यामुळे अवर्षणाची शक्यता केवळ पहिल्या वर्षीच संभवते. दुसऱ्या वर्षी त्याचा प्रभाव फारसा जाणवत नाही. अल-निनोचे २०१५ हे सलग दुसरे वर्ष आहे. त्यामुळे या वर्षात याचा प्रभाव जाणवणार नाही आणि पावसाळा सामान्य असेल.

> गत १४० वर्षांच्या इतिहासात सलग दुसऱ्या वर्षीही दुष्काळ केवळ चार वेळा (१९०४-०५, १९६५-६६, १९८५-८६-८७) पडला आहे. म्हणूनच अल-निनो आहे म्हणून दुष्काळ पडणारच असे मानणे अयोग्य आहे, असेही सिंह यांनी म्हटले आहे.

> हिंदी महासागर द्विध्रुव (आयओडी) अनुकूल आहे आणि भारतात मान्सूनची स्थिती अनुकूल असण्यास मदत होणार आहे, असेही ‘स्कायमेट’ने म्हटले आहे.

> आयओडी अनुकूल असल्यास अल-निनोचा प्रभाव कमी होतो. १९९७ मध्ये अल-निनो शक्तिशाली होते; मात्र याउपरही अनुकूल आयओडीमुळे देशात सरासरी १०२ टक्के पाऊस पडला होता.

> एकंदर आयओडी अनुकूल असल्यास तो अल-निनोच्या प्रभावापासून रक्षण करतो. नेमके हेच यंदा भारताबाबत घडणार असल्याचेही ‘स्कायमेट’ने म्हटले आहे.

Web Title: This year is like regular monsoon; Removing frustrated clouds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.