यावर्षी पाकिस्तानला दिवाळीची मिठाई नाही
By Admin | Updated: October 24, 2014 03:33 IST2014-10-24T03:33:02+5:302014-10-24T03:33:02+5:30
सीमेपलीकडून गोळीबार होण्याच्या घटनांमध्ये मागील काही दिवसांमध्ये सतत वाढ झाल्याचा निषेध म्हणून भारताने यंदाच्या दिवाळीत पाकिस्तानला मिठाई दिलेली नाही

यावर्षी पाकिस्तानला दिवाळीची मिठाई नाही
अमृतसर : सीमेपलीकडून गोळीबार होण्याच्या घटनांमध्ये मागील काही दिवसांमध्ये सतत वाढ झाल्याचा निषेध म्हणून भारताने यंदाच्या दिवाळीत पाकिस्तानला मिठाई दिलेली नाही. विशेष म्हणजे मागील ईदच्या वेळी पाकने भारताला मिठाई पाठवलेली नव्हती.
भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही शेजारी देश एकमेकांना स्वातंत्र्य दिन व आपापल्या सणांच्या निमित्ताने मिठाईची भेट देत असतात. अनेक वर्षांपासून आजवर ही परंपरा चालत आली आहे. परंतु यंदा अत्यंत वेगळी स्थिती आहे. मागील काही दिवस सीमेवर पाककडून गोळीबार होत आहे. भारतीय गावे व चौक्या सातत्याने लक्ष्य केली जात आहेत.
या हल्ल्यांना भारताचे जवान चोख उत्तर देत आहेत; परंतु या हल्ल्यांमुळे दोन्ही देशांतील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत पाकला मिठाई न देण्याचा निर्णय घेण्यात आला. काल रात्री अटारी सीमेवर दोन्ही देशांची फ्लॅग मीटिंग घेण्यात आली होती. त्यावेळीच पाकिस्तानला मिठाई देण्यात येणार नाही, असे सांगण्यात आले होते. (वृत्तसंस्था)